देवरुख ,दि. ०२ : तीन दिवस लपंडाव खेळल्यानंतर आज एस.टी ने देवरुख आगाराची मिडीबस येडगेवाडीत पाठवली मात्र तीन दिवस ही मिडीबस बंद करण्याचे कारण गुलदस्त्यातच आहे. विद्यार्थ्यांच्या तीन दिवसाच्या शाळेच्या नुकसानीच्या कालावधीत राज्य परीवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडून सबुरीचा सल्ला दिला जात होता. आपण बैठक घेऊन तोडगा काढू, असे सांगितले जात आहे.
पालकांच्यावतीने मिडीबस एेवजी चिपळूण - पाचांबे ही बसफेरी येडगेवाडीपर्यंत विस्तारीत करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. मात्र शैक्षणिक गांभिर्य नसलेल्या एस.टी विभागाने आपला हट्ट पूर्ण करत चिपळूण आगाराची बस न पाठवता देवरुख आगाराची मिडीबस पाठवली.
ही मिडीबस येडगेवाडीतील विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी असल्याचे विभागीय नियंत्रकांच्या निदर्शनास आणून देऊनही केवळ हट्टापायी बैठकीचे कारण देत पुन्हा तीच मिडीबस येडगेवाडीच्या माथी मारण्यात आली.देवरुख आगाराची मिडीबस येडगेवाडीत सकाळी ७.३० वा येते तर परत फिरुन कुंभारखाणी माध्यमिक विद्यामंदिर येथे ८.३० वा पोहचते शाळेची वेळ १०.३० आहे येडगेवाडीतील विद्यार्थ्यांना दोन तास आधी जाऊन शाळेत बसावे लागते तर सकाळी लवकर घर सोडावे लागत असल्याने उपाशीपोटीच बाहेर पडावे लागत आहे.
शाळेची जेवणाची वेळ दुपारी १.३० वा असल्याने सकाळापासून उपाशी असणाऱ्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांना दुपारच्या सुट्टीत जेवण्याशिवाय अन्य वेळच मिळत नाही एस.टी च्या आडमुठी धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेच शिवाय आरोग्यही धोक्यात येवू लागले आहे.एस.टी च्या आडमुठी धोरणाला कंटाळून येडगेवाडीतील पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे एस.टी च्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करुन देखील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे त्यांचा निषेध करत आम्ही पाल्यांना शाळेतच पाठवणार नाही अशी भुमिका येडगेवाडीने घेतली आहे.