खेड : महाराष्ट्र क्रांती सेनेचा युवा अध्यक्ष असल्याचे सांगून संघटनेच्या माफक फीमध्ये शिलाई मशीन देण्याचे आमिष देऊन तब्बल ८४० महिलांना २१ लाख १८ हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. या प्रकरणी खेड पाेलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या फिर्यादीनुसार संदीप शंकर डाेंगरे (रा. वाराणी टी. ए. शिरुर कासार, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अंकिता अनिल शिगवण (रा. शेरवल, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. संदीप डोंगरे याने केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचे काम करतो अशा भूलथापा देऊन श्रमकार्ड योजनेंतर्गत महिलांना शिलाई मशीन मिळवून देतो, असे सांगितले. या संस्थेत कर्मचारी काम करत असल्याने त्यांचा पगार, प्रवास भत्ता आदी खर्च संस्थेला करावे लागतात. त्यामुळे प्रत्येक महिलेकडून २ हजार रुपये खर्च येत असल्याचे सांगितले. बाजारात सुमारे १२ हजार रुपये पेक्षा अधिक किंमत असलेली शिलाई मशीन अवघ्या दोन हजार रुपयात मिळत असल्याने या योजनेत खेड तालुक्यातील अनेक महिलांनी पैसे जमा केले.त्याचबराेबर माेडकळीस व नादुरुस्त घर झालेल्या महिलांच्या घरांसाठी घरकूल याेजनेची माहिती देऊन प्रत्येकी १० हजार रुपये जमा केले. मात्र, पाच महिने उलटूनही अद्यापही शिलाई मशीन दिलेली नाही. तसेच घरकूल याेजनेचा लाभही देण्यात आलेला नाही.संदीप डाेंगरे या भामट्याने तब्बल ८४० महिलांना २१ लाख १८ हजार रुपयांना गंडा घातला आहे. या महिलांनी फिर्याद दिल्यानंतर खेड पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र क्रांती सेनेचा युवा अध्यक्ष असल्याचे सांगून महिलांना २१ लाखांचा गंडा
By अरुण आडिवरेकर | Published: July 08, 2023 12:33 PM