रत्नागिरी : वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचा खाेटा एसएमएस पाठवून तब्बल ४ लाख ९९ हजाराला गंडा घातला. हा प्रकार रत्नागिरीतील शिवाजीनगर परिसरात २५ फेब्रुवारी राेजी दुपारी २ ते सायंकाळी ४:३० वाजण्याच्या दरम्यान घडला. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पाेलिस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या फसवणुकीप्रकरणी अशाेक शांताराम धकाते (५५, मूळ रा. देवानगर, नागपूर, सध्या रा. सिद्धीविनायक नगर, शिवाजी नगर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. अशाेक धकाते यांच्या पत्नीच्या माेबाईलवर राहुल गुप्ता नामक व्यक्तीने एमएसईबी पुणेचा अधिकारी असल्याचे भासवून वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचा खाेटा एसएमएस पाठविला. याबाबत अशाेक धकाते यांनी एसएमएसमधील माेबाईल क्रमांकावर फाेन केला असता समाेरून राहुल गुप्ता बाेलत असल्याचे सांगून प्ले स्टाेअरवरून ॲप डाऊनलाेड करून इन्स्टाॅल करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने अशाेक धकाते यांच्या डेबिट कार्डची माहिती घेतली. त्याआधारे वैयक्तिक कर्जाच्या खात्यावरून ५ लाख मंजूर करून ते धकाते यांच्या बॅंक खात्यात जमा केले. या बॅंक खात्यात जमा झालेली रक्कम आधी शिवकुमार नावाच्या व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा करून परत ती धकाते यांच्या खात्यात जमा केली. त्यानंतर मंजुदेवी यांच्या बॅंक खात्यात अनुक्रमे ४,५०,००० रुपये व ४९,००० रुपये ऑनलाइन जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धकाते यांनी सायबर पाेलिस स्थानक गाठले.
Ratnagiri Crime: वीज खंडितचा मोबाईलवर मॅसेज आला, अन् खात्यातून पाच लाख गेले
By अरुण आडिवरेकर | Published: March 02, 2023 5:32 PM