रत्नागिरी : अथर्व फॉर यू इन्फ्रा ॲण्ड अॅॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गुंतवणूकदारांची ९०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातून तक्रार अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात या कंपनीची २८ कोटींची गुंतवणूक असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन, फ्लॅटचा समावेश आहे. या कंपनीविरोधात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे एकत्रित गुन्हा दाखल असल्याने रत्नागिरीतील तक्रारदारांनी तिकडेच तक्रार दाखल करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात या कंपनीची रत्नागिरी, चिपळूण, दापोली येथे कार्यालये होती. ही कार्यालये गेले काही महिने बंद असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. तर कंपनीचे रत्नागिरीतील कार्यालय गेली दोन वर्ष बंद आहे. याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये गावामधून एक तक्रार अर्ज रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल झाला आहे. या कंपनीविरोधात हळूहळू तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, राज्यभरातून एकत्रित गुन्हे मुंबई आर्थिक शाखेकडे दाखल केले आहेत.याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे २८ कोटी रूपयांची गुंतवणूक झाल्याचे कंपनीच्या एजंटकडून सांगण्यात आले. मात्र, किती गुंतवणूकदारांची फसवणूक झाली, ते समजू शकले नाही. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात ठिकठिकाणी या कंपनीने आपल्या शाखा सुरू केल्या. कंपनीने गुंतवणूकदारांना दुप्पट व तिप्पट रकमेच्या परताव्याचे आमिष दाखवले होते. अथर्व कंपनीकडून एजंट्स नेमून गुंतवणूकदारांना प्रलोभने दाखवण्यात आली. काही कालावधीनंतर गुंतवणूकदारांचा परतावा देणे अशक्य होऊ लागताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून पोबारा केला होता.गुंतवणूकदारांना आमीषदिनांक २२ ऑक्टोबर रोजी दहिसर येथून कंपनीचे अधिकारी सूरदास पाटील (४८), सुखदेव म्हात्रे (४१) व सुभाष नाईक (४०) या संशयितांना अटक करण्यात आली. कंपनीचे संचालक शिवाजी नेफाडे, गणेश हजारे, सचिन गोसावी, मुकेश सुदेश यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनी कृषी, शैक्षणिक, आरोग्य, शेळीपालन, आयुर्वेदिक प्रसाधने, औषधे आदी प्रकारांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगण्यात येत होते.