गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळेशेजारील निवेंडी भगवतीनगर परिसरात बिबट्याच्या जोडीचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
भगवतीनगर गावातसुद्धा बिबट्याची जोडी मुक्तपणे संचार करत असून अंधार होताच ही जोडी लोकांच्या दरवाजात बसलेल्या श्वानांना घेऊन जाते. त्यामुळे शेत, आंब्याच्या बागेत, शिवारात, घरांच्या आसपास फिरत असल्याने शेतीच्या कामासाठी किंवा आंब्याच्या बागेच्या राखणेसाठी जाणे धोक्याचे झाले आहे. संध्याकाळ होताच लहान मुलांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
भगवतीनगरचे पोलीस पाटील नितीन मायंगडे यांनी वनविभाग व पोलिसांना ही माहिती दिली आहे. ही बिबट्याची जोडी फिरत असल्याने आज या ठिकाणी तर उद्या दुसऱ्या ठिकाणी दिसून येत आहे. जर एकाच परिसरात वारंवार दिसत असेल तर कॅमेरा किंवा इतर मार्गाने कसे जेरबंद करता येईल, असे वनविभागाकडून सांगण्यात आल्याचे मायंगडे यांनी सांगितले.
भगवतीनगर परिसरात गेल्या चार ते पाच वर्षांपासून माकडांची भरमसाठ संख्या वाढली आहे. माकडांमुळे नारळ, आंबा, चिकू व इतर फळशेती करणे कठीण झाले असतानाच बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतात जाणे धोक्याचे झाले आहे, असे भगवतीनगर येथील ग्रामस्थ वैभव घाग यांनी सांगितले.