राजापूर : रायपाटण परिसरात बिबट्याचा संचार वाढला असून, दोन दिवसांत बिबट्याने एका पाड्यासह गोठ्यात बांधलेल्या शेळीला ठार मारल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री बिबट्याने गावातील पाळेकरवाडीमधील शशिकांत वापिलकर यांच्या घरानजीक असलेल्या गोठ्यात बांधलेली शेळी मारली. त्या शेळीला ओढत बाहेर घेऊन जात असताना, तिच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराच्या आवाजाने घरातील माणसे जागे झाली आणि त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी बिबट्याने तेथून धूम ठोकली. त्यानंतर, पुन्हा एकदा तो बिबट्या त्या गोठ्यात शिरत असताना दिसला. त्यावेळी आजूबाजूला आलेल्या ग्रामस्थांना पाहून बिबट्या पळून गेला होता. दुसऱ्याच दिवशी (शनिवारी) बिबट्याने रायपाटण खिंडीतील घनदाट जंगलात चरत असलेल्या दोन वर्षांच्या पाड्याला ठार मारले. रायपाटण बांबरकरवाडीतील ग्रामस्थ कुणाल बांबरकर यांच्या मालकीचा तो पाडा होता. तेथूनच काही अंतरापर्यंत असलेल्या झाडीत मृत पाड्याला घेऊन तो गेला.
सलग दोन दिवस बिबट्याने रायपाटणमध्ये जनावरांना भक्ष्य केल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. बिबट्या मानवी वस्तीपर्यंत पोहोचल्याने त्याच्या भीतीने काही ग्रामस्थांनी आपली गुरे घरातच बांधायला सुरुवात केली आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी आता रायपाटणमधून होत आहे.