चिपळूण : शहरातील नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून मोफत रिक्षा प्रवासाची सुविधा करून देण्यात आली आहे. यामध्ये ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
शहर युवा सेनेचे शहर अधिकारी निहार कोवळे आणि उपशहर अधिकारी ओंकार नलावडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शहर युवा सेना व शिवसेना संघटनेतर्फे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी मोफत रिक्षा प्रवासाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणानंतर ज्येष्ठ नागरिकांना घरी सोडण्याचीही सुविधा आहे. ही व्यवस्था वडनाका, वाणीआळी, दादर मोहल्ला, बेबल मोहल्ला, बेंदरकरआळी, बापट आळी, नवा व जुना कालभैरव मंदिर परिसर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याला प्रतिसाद मिळाल्यानंतर शहरातील अन्य प्रभागातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. संसर्ग कालावधीत युवा सेनेने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत ग्रामीण भागात संबंधित ग्रामपंचायतींना सॅनिटायझर, मास्क, जंतुनाशके, रक्तदान शिबिर आदी उपक्रमांसह आता मोफत रिक्षा प्रवासाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.