चिपळूण : कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराविषयी असलेली नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी चिपळूण येथील ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटर तसेच रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे कॅन्सरग्रस्तांकरिता मोफत तपासणी केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी चिपळूण येथील ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटरने ही अनोखी संकल्पना राबविली आहे.
या मोफत तपासणी केंद्रासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ संघमित्रा फुले - गावडे यांचे विशेष सहकार्य लाभले. या माध्यमातून नागरिकांमधील कर्करोगाची असलेली भीती दूर करून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचाराबाबत तसेच आजाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
दर बुधवारी ११ ते २ यावेळेत कर्करुग्णांकरिता मोफत तपासणी केंद्र सुरू केले आहे. या तपासणीमध्ये डॉ़ गौरव जसवाल कर्करोग तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. या मोफत तपासणी केंद्राचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटर, चिपळूण आणि रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. ज्या रुग्णांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, अशा रुग्णांना सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊन उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
-----------------------------
कॅन्सरच्या रुग्णांकरिता मोफत तपासणी केंद्राचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ संघमित्रा फुले - गावडे, ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटरचे कर्करोगतज्ज्ञ डॉ़ गौरव जसवाल यांच्या हस्ते करण्यात आले.