२०० ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस
रामपूर : येथील रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार, बुधवार, शुक्रवार हे कोविड लस देण्याचे चार वार असून, आतापर्यंत २०० ज्येष्ठ नागरिकांनी कोविड लस घेतली आहे. रामपूर परिसरात कुठेही कोरोना रुग्ण नाही, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. निकिता शिर्के यांनी दिली.
पालखी घरोघरी जाणार नाही
चिपळूण : रामपूर सहाणेवर केदारनाथ मंडळाचे अध्यक्ष विलास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये रामपूर सहाणेवरच रामपूरची जागृत ग्रामदेवता श्री देवकेदारनाथांची पालखी सहाणेवरच ठेवून पूजा, ओटी करण्याचे नियोजन केले. घरोघर पालखी जाणार नाही. शासनाचे आदेश तंतोतंत पाळून शिमगोत्सव केला. गुढीपाडव्याला सहाणेवर सत्यनारायण पूजा, गोंधळ, १५ एप्रिल शिंपणे होणार असून, तोही जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे परिपत्रकानुसार मर्यादित उपस्थितीमध्ये शिमगा महोत्सवामध्ये नियोजन केले आहे.
भिले-केतकी मार्गावर बसची मागणी
रामपूर : येथील चिपळूण भिले-केतकी भागणेवाडी हा दुर्गम भाग असून, सकाळी विद्यार्थी कामगार वर्ग, मजूर तसेच प्रवासी या गाडीने जात होते. लॉकडाऊनच्या काळात एस्.टी. फेरी बंद केल्यामुळे येथील ग्रामस्थांचे अत्यंत हाल होत आहेत. या मार्गावर खासगी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. याबाबत सीमा गुढेकर यांनी आगार व्यवस्थापकांची भेट घेतली. कोकण प्रवासी महासंघ ग्रामीण विभागीय अध्यक्ष अनिलकुमार जोशी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक अधिकारी, रत्नागिरी अधिकारी यांच्याकडे निवेदने पाठविली, परंतु अद्याप याची दखल घेतली नाही.
जालगावात शिवजयंती उत्साहात
दापोली : शहरानजीकच्या जालगाव येथील हिंदुराज मित्र मंडळातर्फे आयोजित शिवजयंती कार्यक्रम कोविडच्या नियमांचे पालन करून उत्साहात पार पडला. यानिमित्त किल्ले शिवनेरी येथून शिवज्योत आणण्यात आली होती. त्यानंतर शिवप्रतिमेचे पूजन तसेच श्री सत्यनारायण महापूजा , महाड येथील मोरे यांच्यातर्फे शिवकालीन नाणी, शस्त्र यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. स्वरा हजारे हिने शिवाजी महाराजांवर भाषण केले.
लोटेतील सराफ हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे येथील जिजामाता शिक्षण संस्थेच्या कविता विनोद सराफ हायस्कूलच्या आवारात कन्साई नेरोलॅक कंपनीतर्फे विविध प्रकारच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक रवींद्र पाटील, मुख्याध्यापक अनिल जाधव, विजय बसवंत, संजय भोकरे, नितीन जाधव, संदीप चव्हाण यांनी प्रत्येकी एक झाड लावले.
खेडमध्ये ‘जिओ’चा टॉवर बंदअवस्थेत
खेड : गेल्या १० दिवसांपासून जिओ मोबाईल कंपनीची सेवा पुरती कोलमडली आहे. शहरातील तीनबत्तीनाका येथील जिओ कंपनीचा टॉवरच बंदअवस्थेत असल्याची माहिती पुढे आली आहे. हा टॉवर बंद का, याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही. शहरासह तालुक्यात बीएसएनएल सेवेचा उडालेला बोजवारा कायमच आहे. त्यात खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवेतील व्यत्ययाची भर पडली आहे.