स्वातंत्र्यलढ्याचा एकमेव साक्षीदार काळाच्या पडद्याआड
शोभना कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहरातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आशाताई पाथरे यांचे गुजरातमधील जामनगर येथे मंगळवारी निधन झाले. विद्यार्थिदशेत असतानाच त्या १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या होत्या. या लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग घेतलेल्या आशाताई पाथरे यांच्या निधनाने या लढ्याचा रत्नागिरी जिल्ह्याचा एकमेव साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
‘लोकमत’ने काही वर्षांपुर्वी क्रांतिदिनाच्या निमित्ताने आशाताईंची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी विद्यार्थिदशेतील आठवणींना उजाळा दिला. ९ ऑगस्ट १९४२ ला मुंबईला त्यावेळच्या गवालिया टँकवर म्हणजे आताच्या आझाद हिंद मैदानावर महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ची घोषणा केली आणि ब्रिटिश सरकारने सर्व प्रमुख नेत्यांना गजाआड केले. त्यावेळी विद्यार्थिदशेतही देशभक्ती ओतप्रोत भरलेली असे. यावेळी आशाताई यांच्या वर्गातील देशप्रेमाने भारावलेला मधू पोंक्षे नावाचा एक मित्र त्यावेळच्या सांगली स्टेशनसमोरील चौकात उभा राहून ब्रिटिशांविरुद्ध भाषण करू लागला. आशाताईंसह सर्व मित्र - मैत्रिणी त्याच्यासोबत होते. जमाव गोळा झालेला पाहताच ब्रिटिश सरकारचे शस्त्रास्त्रधारी घोडेस्वार या सर्वांवर चालून आले. मात्र, मधू पोंक्षे जराही न डगमगता भाषण करीत होते. ब्रिटिश पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी प्रखर लाठीहल्ला सुरू केला. आपल्या मित्राला मारू नये म्हणून या सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्याभोवती कडे केले होते. हे कडे तोडून पोंक्षे यांना बाहेर ओढून पोलिसांनी त्यांना अमानुषपणे दांडक्याने मारहाण केली. ते पळत स्टेशनकडे जात असताना दांडक्याचा फटका त्यांच्या डोक्यावर बसला आणि ते स्टेशनच्या पायरीवरच बेशुद्ध पडले. डोके फुटल्याने त्यातून रक्ताचा पाट वाहू लागला. मात्र, तिथे आलेल्या टांगेवाल्याला दया आल्याने त्याने त्याच्या टांग्यातून या सर्वांना दवाखान्यात सोडले. ही आठवण आशाताईंना जशीच्या तशी आठवायची.
येरवडा येथील कारागृहातही आशाताईंनी सक्तमजुरीचीही शिक्षा भोगली होती. त्यांच्या बरॅकमध्ये यावेळी सातारा येथील सुलोचना जोशी, कुसुम मोकाशी या त्यांच्या मैत्रिणीही होत्या. त्यांच्यासमवेत असणाऱ्या गुन्हेगार महिलांसोबत राहण्याचे अनुभव अंगावर शहारे निर्माण करणारे असल्याचे आशाताई सांगत. नऊ महिन्यांच्या गर्भार असलेल्या सुलोचना जोशी यांना ब्रिटिश सरकारने बर्फाच्या गादीवर झोपण्याची शिक्षा दिली. मात्र, देशप्रेमासाठी तिने तीही आनंदाने सोसली. तो काळ देशप्रेमाने भारावलेला होता. त्यामुळे चले जाव चळवळीत विद्यार्थी वर्गही त्याकाळी देशभक्तीने प्रेरित झाला होता, याची अनेक उदाहरणे त्या भारावलेल्या मनाने सांगत.
त्यांचे पती आर्मीत नोकरीला होते. त्यांचा पाठिंबाही आशाताईंना होता. त्यांच्या निधनानंतर वृद्धापकाळात मुलगा, बॅंक अधिकारी असलेले अरुण पाथरे यांनी त्यांची सेवा करण्यासाठी नोकरीही सोडली होती. दुर्दैवाने त्यांचेही आकस्मिक निधन झाले.
त्यांनतर काही वर्षांपासून त्या गुजरात जामनगर येथे आपल्या मुलीकडे राहत होत्या. मंगळवारी त्यांचे निधन झाले. जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव साक्षीदार हरपला आहे.
फोटो आहे. २७ रोजीच्या शोभना फोल्डरमध्ये आशाताई पाथरे नावाने