लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे महत्त्व खूप आहे. तेलामुळे जेवण स्वादिष्ट आणि चवदार बनते. मात्र, तेलाचा पुनर्वापर केला, तर ते तेल आरोग्याला हानिकारक ठरते. असे असतानाही अनेक हाॅटल्समध्ये तेलाचा अनेक वेळा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यास आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. काही वेळा कॅन्सरचाही धोका संभवतो. त्यामुळे खाद्यतेलाचा वारंवार वापर केेल्याचे आढळल्यास अशा हाॅटेल्सवर कारवाई होऊ शकते.
वारंवार तळलेल्या तेलात फ्री रेडिकल्स तयार होतात. हे रेडिकल्स शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. या रेडिकल्समुळे कॅन्सरची शक्यता वाढते. तेलाच्या पुनर्वापरामुळे ॲथेरोस्कॉलरोसिस होऊ शकतो. ज्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढून धमन्या ब्लॉक होतात. ॲसिडिटी, हृदयासंबंधित आजार, अल्जायमर, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
.........
तेलाचा पुनर्वापर आरोग्यासाठी घातक
वारंवार तळलेल्या तेलात फ्री रेडिकल्स तयार होतात. त्यांचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. अनेकदा यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. एकदा वापरून झालेले तेल पुनःपुन्हा वापरल्याने ॲथेरोस्कॉलरोसिसने शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढून धमन्या ब्लॉक होतात.
...............
रस्त्यावर न खाल्लेलेच बरे...
- रस्त्यावरील तळलेले खाद्यपदार्थ वारंवार तळलेल्या तेलात तळले जातात.
- तेलाचा पुनर्वापर वारंवार झाल्यास पॉलिमरायझेशन प्रक्रिया होऊन तेलातील पोलर कम्पाउंडचे प्रमाण वाढते.
- त्यामुळे बाहेरचे तळलेले पदार्थ न खाणेच उत्तम.
.......
पुनर्वापर टाळाच
एक किंवा दोनपेक्षा अधिक वेळा तेलाचा पुनर्वापर टाळाच. असे तेल शरीरात विष तयार करते. यापासून कोलेस्ट्राॅल वाढणे, पोटाचे, त्वचेचे आजार वाढतातच; पण काही वेळा कॅन्सरचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे ही काळजी घ्यावी.
-डाॅ. अशोक कांबळे, जनरल फिजिशिअन, रत्नागिरी
........
तेल प्रकार लक्षात घ्यावे
प्रत्येक तेल वेगळे असते. काहींमध्ये स्मोकिंग पॉइंट जास्त, तर काहींमध्ये कमी. काही तेल गरम केल्यावर खूप धूर निघतो, तर काहीतून अजिबात धूर निघत नाही. सनफ्लॉअर ऑइल, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल या तेलांचा स्मोकिंग पॉइंट जास्त आहे, अशा तेलाचा वापर तळण्यासाठी करू नये.
........
...तर होईल गुन्हा दाखल
खाद्यपदार्थ विक्रेते अथवा हाॅटेल्समध्ये तेलाचा पुनर्वापर तीन वेळापेक्षा जास्त वेळा करता येत नाही. अधिक वेळा केल्याचे आढळल्यास किंवा कुणाच्या जीवितास धोका झाल्याचे निदर्शनास आल्यास केवळ दंडात्मक कारवाईच नाही, तर गुन्हा दाखल झाल्यास प्रसंगी तुरुंगातही जावे लागेल, असा कायदा करण्यात आला आहे.
-संजय नारगुडे, सहायक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन)
...................
अहो आश्चर्यम, एकावरही कारवाई नाही...
-तीनपेक्षा अधिक वेळा तळण्यासाठी वापरलेले तेल नेण्यासाठी शासनकृत संस्था नियुक्त करण्यात आली आहे. याचे १६ विक्रेते सदस्य आहेत.
-जिल्ह्यात या प्रकरणाखाली यावर्षी एकही कारवाई करण्यात आलेली नाही, असे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.