रत्नागिरी : येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातर्फे २१ ते २५ जुलैदरम्यान गोड्या पाण्यातील कोळंबी आणि मत्स्योत्पादन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संशोधन केंद्रातर्फे देशात प्रथमच गोड्या पाण्यातील कोळंबी यावर विशेष संशोधन करण्यात आले आहे. या कोळंबीची बीजनिर्मिती, वाहतूक व संवर्धनाबाबत मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. राष्ट्रीय बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत गोड्या पाण्यातील कोळंबी आणि मत्स्योत्पादन हा कार्यक्रम घेतला जात आहे. सद्यस्थितीत राज्यात उपलब्ध असलेले पाझर तलाव, तळ्यांमध्ये गोड्या पाण्यातील जंबो कोळंबीची आणि माशांची शेती करता येणे शक्य आहे. या प्रशिक्षणामध्ये मत्स्य शेतीसाठी लागणारे तलाव कसे बांधावेत, तलावाची संवर्धनपूर्व तयारी कशी करावी, कोळंबी व मासे यांचे दर्जेदार बीज कसे ओळखावे, कोळंबी व मासे यांची वाढ कशी मोजावी, कोळंबी व मासे यांचे एकत्रित मत्स्यशेती कशी करावी, कोळंबी व मासे वाढल्यानंतर कसे पकडावे व चांगल्या स्थितीत बाजारात कसे न्यावे, अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल, बँकांच्या विविध योजना, व्यवसाय सुरु करण्यास उपलब्ध असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध अनुदान योजना याबाबत सविस्तर माहिती तज्ज्ञ मार्गदर्शक देणार आहेत. याशिवाय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मत्स्य प्रकल्पावर भेट आयोजित करण्यात येते. हा कार्यक्रम २१ ते २५ जुलै या कालावधीत होणार आहे. अधिक माहितीसाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथील सहाय्यक संशोधन अधिकारी सचिन साटम ९५५२८७५०६७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन येथील संशोधन केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञनिक अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
गोड्या पाण्यातील कोळंबी आणि मत्स्योत्पादन
By admin | Published: July 17, 2014 11:50 PM