आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी, दि. ३0 : : ई. पी. एस. १९९५ पेन्शन संबंधात भगतसिंह कोशियार समितीच्या शिफारशी लागू करणे तसेच ६५ वर्षांवरील पेन्शनधारकांना कमीत कमी ३००० रुपये पेन्शन आणि सध्याच्या दराप्रमाणे महागाई भत्ता लागू करण्याच्या मागणीसाठी निवृत्त कर्मचारी समन्वय समितीने काढलेल्या मोर्चामध्ये शेकडो पेन्शनर्स सहभागी झाले होते.
या मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून शेकडो पेन्शनर्स मारुती मंदिर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमा झाले होते. निवृत्त कर्मचाऱ्यांनी शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून या मोर्चाला सुरुवात झाली.
हा मोर्चा मारुती मंदिर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. त्यावेळी सहभागी झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी दिली. भाजपाची सत्ता आल्यानंतर ९० दिवसांच्या आत कोशियार समितीने केलेल्या शिफारशी लागू करण्यात येतील, असे आश्वासन भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिले होते. मात्र, भाजपचे सरकार येऊन तीन वर्षांचा कालावधी झाला तरी, अद्याप कोशियार समितीच्या शिफारशी लागू केलेल्या नाहीत. त्या लागू करण्यात याव्यात, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवृत्त कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. त्यावेळी मोर्चेकरांनी पंतप्रधानांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी हजारो निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.