लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : इंधनाच्या दरात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे भाज्यांचे दर पुन्हा कडाडले आहेत. वीस टक्के दराने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांद्याचे दर काहीअंशी खाली आल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
उन्हाळा सुरू झाल्याने पालेभाज्यांना वाढती मागणी आहे. बाजारात परजिल्ह्यांतील तसेच गावठी भाज्या उपलब्ध असून इंधनाच्या दरवाढीमुळे भाज्यांच्या दरावर परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. फरसबी, गवार, भेंडी, सिमला मिरची, गाजर, मटार, घेवडा, कोबी, फ्लॉवरसारख्या विविध भाज्यांच्या दरात वीस टक्केने वाढ झाली असल्याने गृहिणींना जमाखर्चाची जुळणी करणे अवघड बनले आहे.
वर्षभरासाठी लागणारे तिखट एकदाच केले जाते. तिखटासाठी लागणारी लाल मिरची बाजारात उपलब्ध असून १५० ते ३५० रुपयांच्या दरात मिरची विक्री सुरू असून मागणीही वाढती आहे.
कांदा, बटाटा, लसणाचा वापर सर्रास स्वयंपाकात केला जातो. गेले पाच-सहा महिने कांद्यांच्या दरात चढउतार सुरू आहे. कांदा १७ ते २० रुपये, तर बटाट्याची २१ ते २५ रुपयाच्या घरात विक्री सुरू आहे. लसूण १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने कांद्याला वाढती मागणी आहे.
ऋतुमानामुळे उत्पादनावर परिणाम झाला तरी तयार झालेला आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ३५० ते १००० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू असून दर मात्र सर्वसामान्यांसाठी आवाक्याबाहेरचे आहेत.
उष्मा वाढल्यामुळे कलिंगडाचा खप वाढला आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यांतून कलिंगड विक्रीसाठी येत आहेत. १५ ते २० रुपये किलो दराने कलिंगड विक्री सुरू आहे. जागोजागी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. अखंड, कापलेले कलिंगड याची विक्री सुरू आहे.
महागाईने आधीच कंबरडे मोडले आहे. त्यातच भाज्यांच्या दरातील वाढ परवडेनाशी झाली आहे. महागाईवर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाने होत नसल्याचे दिसत आहे.
- जयश्री मोरे, गृहिणी.
इंधनाच्या दरात वाढ झाली की, भाज्यांच्या दरात वाढ होते. परिणामी, ग्राहकांना खर्चाचा ताळमेळ बसविणे अवघड होत आहे. शासनाकडून सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे.
- वेदिका पवार, गृहिणी.