चिपळूण : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे सिंहगड येथे मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला सूरज संतोष ढवळे (१९) हिंगणे पुणे याला सिंहगड पोलिसांनी चिपळूण बहादूरशेख नाका येथून बुधवारी अटक केली आहे. याकामी चिपळूण पोलिसांनी देखील महत्वाची भूमिका बजावली. सूरज ढवळे हा गेले ८ महिने फरार होता.
याबाबत अधिक वृत्त असे की खूनाचा प्रयत्न केल्याप्रकर्णी सूरज संतोष ढवळे व त्याच्या इतर साथीदारावर पुणे सिंहगड पोलीस ठाण्यात मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणात पोलिसांनी ढवळेच्या साथीदारांना सिंहगड पोलिसांनी अटक केली होती. मात्र सूरज हा फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी सर्वकष प्रयत्न केले मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. सिंहगड पोलीस त्याचा सतत शोध घेत होते.
आशा परिस्थितीत सूरज हा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खात्री केल्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. वरिष्ठांनी देखील पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठांचे आदेश प्राप्त होताच पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलिसांचे एक पथक घेऊन चिपळूणमध्ये दाखल झाले. येथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांनी संशयिताला जेरबंद करण्यासाठी व्यवस्थित सापळा रचला आणि सूरज ढवळे याला अखेर ८ महिन्यानंतर चिपळूणमधून अटक केली.
पोलीस उपायुक्त सोहेल शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन,पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजूरकर, सहाययक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहाय्यक उपनिरीक्षक आबा उतेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, विकास पांडुळे, विकास बांदल, देव चव्हाण,सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, अमोल पाटील, अमित बोडरे, अविनाश कोंडे या पथकाने ही कारवाई केली.