लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. यावर्षी २० हजार क्विंटल भात खरेदीचे उद्दिष्ट असताना, जिल्ह्यातील १९३५ शेतकऱ्यांकडून २३ हजार १८०.६५ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. निसर्ग वादळ तसेच लांबलेला पाऊस यामुळे भात उत्पादन धोक्यात आले असतानाही शेतकऱ्यांचा भात विक्रीसाठी चांगला प्रतिसाद लाभल्याने उद्दिष्टपूर्ती करण्यात यश आले आहे.
यावर्षी शासनाकडून भात खरेदीसाठी प्रति क्विंटलला १८६८ रुपये दर देण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी क्विंटलमागे ५३ रुपयांची दरवाढ देण्यात आली होती. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे शासन ठरवून देईल त्या दराने शेतमाल खरेदी करण्यात येतो. जिल्ह्यात दरवर्षी भात खरेदीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभतो. २०१३-१४ मध्ये विक्रमी प्रतिसाद लाभला होता. त्यावर्षी २४ हजार ४९८.४६ क्विंटल भाताची खरेदी झाली होती. त्या तुलनेत यावर्षीही चांगली भात खरेदी झाली आहे.
जिल्ह्यात खरेदी-विक्री संघ आणि विविध कार्यकारी सोसायटीतर्फे धान्य खरेदी करण्यात येत असून, खेड, दापोली, केळशी, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, पाचल, चिपळूण, मिरवणे, आकले, शिरगाव, शिरळ आदी १४ केंद्रांवर भात खरेदी करण्यात आली. खरेदी केलेला भात जिल्हा पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात येऊन त्यानंतर भात भरडण्यासाठी निविदा काढण्यात येते. भात भरडल्यानंतर तयार झालेला तांदूळ जिल्ह्यातील रास्त दर धान्य दुकानात विक्रीसाठी वितरित करण्यात येत आहे.
कोट
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येते. शेतकरी स्वत:पुरता भात ठेवून अधिकचा भात विक्री करीत असल्याने शेतकऱ्यांना भात विक्रीतून चांगले उत्पन्न प्राप्त होत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना दरही चांगला प्राप्त झाला. शिवाय उद्दिष्टपूर्ती करण्यात यश आले.
- पी. जे. चिले, अधिकारी, दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, शाखा रत्नागिरी.
चौकट
जिल्ह्यातील १४ केंद्रांवरील भात खरेदी
केंद्र शेतकरी भात खरेदी
खेड २५७ ५४७२
दापोली ७८ ६७८.४०
केळशी २१७ १२२४.४०
गुहागर २१८ १४१७.२०
रत्नागिरी २१८ १७८१.६०
संगमेश्वर १९४ २६६६
लांजा २४ १५५.६०
राजापूर ४८ ५२२.८५
पाचल ४२ ५५७.८०
चिपळूण २१९ ३३८०
मिरवणे १३८ २१६८.८०
आकले ५० ५१५.२०
शिरगाव १८८ १९४९.६०
शिरळ ४४ ६९०.४०
एकूण १९३५ २३१८०.६५