लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : दीडशे वर्षांपासूनचा इतिहास असलेल्या व इंग्रजी राजवटीपासून कौलारू वास्तूत असलेल्या रत्नागिरीच्या न्यायालयाचे रूपांतर आता नवीन इमारतीत करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयाचे कामकाज आता नवीन वास्तूतून चालणार आहे. रत्नागिरी जिल्हा व सत्रन्यायालय विस्तारित नूतन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा व सत्रन्यायालय विस्तारित नूतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे, प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश मोहम्मद कासिम शेख मुसा शेख यांच्यासह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्रन्यायाधीश एल. डी. बीले, बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दिलीप धारिया, वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आनंद सामंत, कोर्ट मॅनेजर युसुफ चुनावाला, प्रबंधक व्ही. बी. नाचणकर यांच्यासह जिल्ह्यातील न्यायाधीश व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे लांजा, राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यातील सामाजिक संस्थांना संगणक, डिजिटल वेलनेस मशीन, ग्रामर बुक, सायकल व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. सहायक अधीक्षक भावे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत सादर केले, तर कार्यकमाचे निवेदन ॲड. गद्रे आणि सोनाली खेडेकर यांनी केले. या कार्यकमाचे आभारप्रदर्शन जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्रन्यायाधीश एल. डी. बीले यांनी केले.