प्रवाशांमधून समाधान
रत्नागिरी : कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेसाठी दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. शासनातर्फे महामंडळाच्या माध्यमातून २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामधून सवलत देण्यात येत आहे.
महागाई भत्त्यापासून वंचित
रत्नागिरी : कोरोनामुळे सरकारची तिजोरी रिकामी झाल्याचे सांगून निवृत्त वेतनधारकांचा महागाई भत्ता स्थगित करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगातील थकबाकीदेखील देण्यात आलेली नाही. याशिवाय अन्य लाभांपासून निवृत्त कर्मचाऱ्यांना उपेक्षित ठेवण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सेवक संघाची सभा
रत्नागिरी : जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची २०१९-२० आर्थिक वर्षाची सभा नुकतीच झाली. या सभेत जमीनधारक कर्जमर्यादा २१ लाखांवरून २५ लाख करण्यात आली. पतपेढीच्या प्रथम कार्यालयात इमारत दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. सभासद साहाय्यता निधीबाबत दुरुस्ती ठेवण्यात आली होती.
विचारे यांची निवड
खेड : नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून अंकुश अरविंद विचारे यांची निवड करण्यात आली आहे. फारुख मणियार यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी ७ ते ८ महिने शिल्लक राहिले आहेत. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी विचारे यांची निवड जाहीर केली.
पालखी उत्सव रद्द
रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून मागलाड येथील श्री देव लक्ष्मीकेशव पालखी उत्सव रद्द करण्यात आला आहे. दिनांक ३ एप्रिल रोजी हा उत्सव घेण्यात येणार होता. शासनाच्या नियमांचे पालन करूनच घरोघरी पालखी नेण्यात येणार आहे.
बसफेरीला मुदतवाढ
खेड : खेड आगारातून तुळशी विरार, अर्नाळा बसफेरी शिमगोत्सवानिमित्त सुरू करण्यात आली होती. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने दिनांक १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खेड येथून सकाळी ८.३० वाजता सुटून सायंकाळी ६ वाजता अर्नाळा येथे पोहोचणार आहे. अर्नाळा येथून रात्री ९.३० वाजता सुटून पहाटे ६ वाजता खेड येथे पोहोचणार आहे.
साप्ताहिक स्पेशल गाडी
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर भावनगर-कोचुवेल्ली साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार दिनांक १३ एप्रिल ते ८ जून या कालावधीत तीच गाडी धावणार आहे. २३ डब्यांची ही स्पेशल गाडी असून, दर मंगळवारी सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी भावनगर येथून सुटणार आहे.