राजापूर : तुळसवडे पंचक्रोशीतील गावाची अनेक दिवसांची मागणी असलेल्या आरोग्य उपकेंद्रासाठी आता जागा उपलब्ध झाली आहे. उपकेंद्राच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून मिळावा, अशी मागणी तुळसवडे-सोलिवडे ग्रामपंचायतीतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
तुळसवडे पंचक्रोशीत आरोग्य उपकेंद्र नसल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यासाठी अनेक वेळा तुळसवडेत आरोग्य उपकेंद्र व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी जागेची उपलब्धता होत नव्हती. त्यामुळे निधी मंजूर होऊनही काम करता येत नव्हते. परंतु, आता आवश्यक ती जमीन उपलब्ध झाली असून, ही जमीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने ७/१२ वर नोंद झालेली आहे. त्यामुळे जागेचा प्रश्न आता निकाली निघालेला आहे. आता या जागेवर प्रत्यक्ष इमारत बांधण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले आहे.
याबाबत तुळसवडे-सोलिवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया आडिवरेकर आणि उपसरपंच संजय कपाळे यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांची भेट घेतली व चर्चा केली. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आठल्ये यांनीदेखील तुळसवडे गावचे सरपंच आणि उपसरपंच यांना लवकरात लवकर निधी देण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती सरपंच सुप्रिया आडिवरेकर व उपसरपंच संजय कपाळे यांनी दिली आहे.