खेड : आय. सी. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. सारंग यांना बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या संस्थेतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, पदक व प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्राचीन इतिहासाचे गाढे अभ्यासक अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे. प्राचार्य डॉ. सारंग हे मुंबई विद्यापीठाच्या अनेक कमिट्यांवर कार्यरत आहेत. महाविद्यालयांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅक’ चे ते सदस्य आहेत. मुंबई विद्यापीठाच्या इतिहास व पुरातत्त्वशास्त्र तसेच फाऊंडेशन कोर्स या विषयांच्या अभ्यास मंडळावरही ते सध्या काम करत आहेत. त्यांचे अनेक संशोधन लेख, लघु संशोधन प्रकल्प, शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत. काही शोधनिबंध उत्कृष्ट शोधनिबंध म्हणूनही निवडले गेले आहेत. त्यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या सन्मानाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराभाई बुटाला, उपाध्यक्ष एन. डी. गुजराथी, सचिव मंगेश बुटाला, महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.