रत्नागिरी : जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या कोकण प्रकरणातील मास्टरमाइंड अन्य एकाला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबमध्ये अटक करण्यात आलेला मुकेश शेरॉन या साऱ्याचा मास्टरमाइंड असून, तो पंजाबमध्ये हवाई दलामध्ये काम करतो.
अटक केलेल्या अन्य आरोपीचे नाव अंकित सनबीर सिंग (२३, राजस्थान) असून, त्यानेच हे कोकेन रत्नागिरीत पाठवले होते. रत्नागिरी ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या दोन पथकांनी पंजाब आणि राजस्थानमध्ये जाऊन ही कामगिरी केली आहे.रत्नागिरीत गत रविवारी रात्री ९३० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्याची ही पहिलीच घटना होती. त्यात तटरक्षक दलाच्या दोन कर्मचाऱ्यांसह अन्य एकाला अटक करण्यात आली. इतके कोकेन रत्नागिरीत विक्रीसाठी आले, याचा अर्थ यामागे मोठे रॅकेट असणे निश्चित होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी या प्रकरणी विशेष लक्ष दिले. त्यातून रत्नागिरी ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली.अटक करण्यात आलेल्या तीन लोकांकडून पोलिसांना जी माहिती उपलब्ध झाली, त्यानुसार ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश कदम आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे शिरीष सासने यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पंजाब आणि एक पथक राजस्थानला रवाना करण्यात आले. त्यानुसार पंजाबमध्ये मुकेश शेरॉन याला अटक करण्यात आली. तो हवाई दलाचा कर्मचारी असल्याने त्याला आधी तेथील न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाच्या परवानगीने त्याला ताब्यात घेऊन रत्नागिरीचे पथक परतीच्या मार्गावर आहे. याचदरम्यान दुसऱ्या पथकाने अंकित सनबीर सिंग (२३, राजस्थान) याला अटक केली आहे. रत्नागिरीत अटक करण्यात आलेल्या दिनेश सिंग याला अंकितकडूनच कोकेनचा पुरवठा झाला होता. त्याला अटक करणारे पथक शुक्रवारी रत्नागिरीत दाखल झाले. अंकितला खेड न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.सुरक्षा विभागातील कर्मचारीकोकेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. एका आठवड्यात पोलीस या प्रकरणाच्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातील पाचपैकी तीन आरोपी हे देशाच्या महत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारी आहेत. दोघे तटरक्षक दलात तर एक हवाई दलात काम करतो.