दहावीच्या मूल्यांकनानुसार आता अकरावीचे प्रवेश होणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, ठराविक महाविद्यालयांकडे विद्यार्थी, पालकांचा ओढा असल्याने प्रवेशासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. सीईटी परीक्षेच्या गुणांकनावर प्रवेश होणार असल्याने अनेक पालक निर्धास्त होते. मात्र, आता परीक्षा न होता मूल्यांकनातील गुणांच्या आधारे प्रवेश होणार असले तरी प्रवेश मिळविण्यासाठी ‘पैशांचा खेळ’ होण्याची शक्यता आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक महाविद्यालयांना दिलासा प्राप्त झाला असून प्रवेशाचा व्यवसाय करण्याची जणू संधी प्राप्त झाली आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांचा प्रश्नच नाही. त्यांच्या वर्गातील ठरलेली विद्यार्थी संख्या कुठेही जात नाही. मात्र, शहरी भागातच शिवाय ठराविक महाविद्यालयांकडे ओढा असल्याने प्रवेश प्रक्रिया त्यांच्या नियमांनुसार सुरू होणार आहे. अनेक पालकांनी आतापासूनच सेटिंग लावण्यास प्रारंभ केला आहे. एकूणच या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी वेळेच्या मर्यादेमुळे मुलांपर्यत विषय कितपत पोहोचला आहे. हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कोरोना नसलेल्या गावातून शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु कोरोनाची भीती अद्याप कमी न झाल्याने पालकांकडून मुलांना शाळेत पाठविण्यास अल्प प्रतिसाद लाभत आहे. एकूणच कोरोनामुळे मुलांचे शालेय शिक्षण जरी सुरू असले तरी शिक्षण क्षेत्राचा झालेला खेळखंडोबा जवळून अनुभवता येत आहे.
शिक्षणाचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:35 AM