गणेशोत्सव दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. कारागिरांची लगबग सध्या सुरू आहे त्यातच पर्यावरण पूरक गणपतीला मोठी मागणी होताना पाहायला मिळते आणि नुसती भारतातच नाही तर परदेशातही पर्यावरण गणपतीला मागणी होत असल्याचं सध्या चित्र निर्माण झाला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे सारख्या ग्रामीण भागातून अमेरिकेला गणपती निघालेत ही स्थिती म्हणजे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यासारखीच आहे. कारण प्रथमच ज्ञानेश कोटकर यांच्या हस्तकलेतून साकारल्या गेलेल्या १०१ गणेश मूर्तींना अमेरिकेतून मागणी आली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसात या गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना होतील, याचा आनंद मूर्तिकार ज्ञानेश कोटकर आणि त्यांच्या कुटुंबियांना पाहायला मिळत आहे. या गणेशमूर्ती घडवताना बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागले परंतु त्यांची मेहनत गणपती बाप्पाच्या कृपेने सार्थकी ठरली.