कुवे : नव्या वर्षाचे वेध सर्वांनाच लागले असून, सर्वाधिक लोकांचे लक्ष नव्या वर्षातील सुट्ट्या आणि सणांच्या दिवसाकडे लागले आहे. नव्या वर्षात गणपती बाप्पा थोडे उशिरा येणार असून, त्यांचा मुक्काम सहाऐवजी पाच दिवसच राहणार आहे. गणेशाचे आगमन लांबल्यामुळे दिवाळीही एक महिना पुढे गेली आहे.सर्वांचे आराध्य दैवत असलेला व कोकणचा मोठा सण असलेला गणेशोत्सव यावर्षी उशिरा येणार आहे. या नवीन वर्षात गणपतीचे घरोघरी पाच दिवसच आगमन होणार आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात १७ तारखेला गणपतीचे आगमन होणार आहे, तर २१ तारखेला विसर्जन होणार आहे. त्यामुळे दरवर्षी सहा दिवस असणारे गणपती यावर्षी पाच दिवसच विराजमान होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात ११ तारखेला दीपावली साजरा होणार आहे. डिसेंबर महिन्यात गुुरुवार, २४ डिसेंबरला मुस्लिम बांधवांचा ईद - ए - मिलाद हा दिवस व दत्त जयंती या एकाच दिवशी आहे.विशेषत: कोकणात होळी, दसरा, गणेश चतुर्थी हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या उत्सवासाठी पुणे वा मुंबई येथील चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतात. त्यामुळे या उत्सवाची रंगत काही औरच असते. यावर्षी शिमगा ५ मार्च रोजी आहे. काही सण, उत्सव मागील वर्षापेक्षा लवकर, तर काही उशिरा येणार असून, या सणाचा आनंद मात्र काही उशिराने घ्यायला मिळणार आहे. बहुतांश सणाचा आनंद लगेचच घेता येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताबरोबर आता या नवीन वर्षाच्या उत्सवाची आखणीही आतापासूनच सुरु झाली आहे. कोकणात गणपती, होळी, दिवाळी व शिमगा या सणांना चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यंदा त्यांना हे सण धूमधडाक्यात साजरे करता यावेत, यासाठी आतापासूनच या उत्सवांच्या तारखा आणि त्याला जोडून घ्यावयाच्या सुट्ट्या याची चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रयत्नांसाठी नव्या वर्षापासूनच सुरूवात होणार आहे. (वार्ताहर)
गणपती बाप्पांचा मुक्काम यावर्षी फक्त पाचच दिवस
By admin | Published: December 30, 2014 9:32 PM