रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतरच झाला आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि कोकण रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक यामुळे गणपती घरात आणि मुंबईकर अजून गाडीतच, अशी स्थिती झाली होती.सोमवारी गणेशचतुर्थीसाठी हजारो मुंबईकर शनिवारपासून गावी येण्यास निघाले आहेत. गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांसाठी एस्. टी. महामंडळाने जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. तर कोकण रेल्वेने जादा गाड्यांसह जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. काहीजण खासगी वाहनाने आपल्या गावी येण्यास निघाले आहेत. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली आहे.
त्यातच चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम आणि महामार्गावर पडलेले खड्डे यामुळे मुंबईकरांना खडतर प्रवासातूनच गावी यावे लागत आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील वाहनांच्या गर्दीमुळे गावी पोहोचण्यास तब्बल १५ तास लागत आहेत.तर कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यादेखील १ ते ६ तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वेने लवकर घरी पोहोचण्याचा मुंबईकरांचा प्रयत्नही फसला. कोकण रेल्वे मार्गावरून सोमवारी धावणाऱ्या गाड्यादेखील विलंबाने धावत होत्या. त्यामुळे गणपतीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला.
या मार्गावरील दिवा - सावंतवाडी ३३ मिनिटे उशिराने धावत होती. त्याचबरोबर डबलडेकर १ तास ३३ मिनिटे, जनशताब्दी ५७ मिनिट, राजधानी एक्स्प्रेस २ तास २१ मिनिट, लोकमान्य टर्मिनल गणपती विशेष २ तास २८ मिनिट, सावंतवाडी गणपती विशेष २ तास १२ मिनिट, तुतारी एक्स्प्रेस १ तास ४५ मिनिट, कोकणकन्या एक्स्प्रेस २ तास ५५ मिनिट, ०९१०६ सावंतवाडी गणपती विशेष ३ तास ४ मिनिट, मंगलोर एक्स्प्रेस २ तास ३२ मिनिट, पुणे - मडगाव ३ तास ४५ मिनिट आणि नेत्रावती एक्स्प्रेस ६ तास ४६ मिनिट उशिराने धावत होती.