आॅनलाईन लोकमतसंगमेश्वर , दि. २१ : आयटीआय प्रशासन, बांधकाम विभाग आणि शासकीय विभागांच्या असहकार्यामुळे यावर्षीही संगमेश्वरातील आयटीआयच्या इमारतीच्या स्थलांतराचा प्रश्न अधांतरी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या स्थलांतरासाठी गेले वर्षभर पाठपुरावा करणारे संघर्ष समितीचे गणेश चाचे यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत भर पावसात संगमेश्वरात या प्रश्नाविषयी जनजागृती करणाऱ्या पत्रकांचे वाटप सुरू केले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाला संगमेश्वरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. अजूनही आठवडाभर हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
भर पावसात अनुपमा चाचे, तन्वी चाचे यांच्यासह संघर्ष समितीचे सुशांत कोळवणकर, मधुभाई नारकर, संजय कदम, दिलीप रहाटे यांनीही चाचेंना साथ दिली. संगमेश्वरातील नागरिकांनीही या आंदोलनाला साथ दिली. यापुढे हे आंदोलन संगमेश्वर परिसरातील प्रत्येक शैक्षणिक संकुलाच्या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे चाचे यांनी सांगितले. परिसरात जनजागृती करून पुढील महिन्यात आयटीआय विरोधात आपण मोठे जनआंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.