Ganesh Chaturthi 2018 : रोबोटच्या तोंडातून आरत्या देणारे चलचित्र, लक्षवेधी देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 02:47 PM2018-09-17T14:47:44+5:302018-09-17T14:49:27+5:30
चिपळूण नगर परिषद कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी प्रबोधनात्मक, पौराणिक कथेवर आधारित सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखावे साकारले जातात. यावर्षी नगर परिषदेने रोबोटच्या तोंडातून गणरायाच्या आरत्या व सामाजिक संदेश देणारा चलचित्र देखावा साकारला आहे.
चिपळूण : चिपळूण नगर परिषद कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी प्रबोधनात्मक, पौराणिक कथेवर आधारित सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखावे साकारले जातात. यावर्षी नगर परिषदेने रोबोटच्या तोंडातून गणरायाच्या आरत्या व सामाजिक संदेश देणारा चलचित्र देखावा साकारला आहे.
नगर परिषद कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ६ फुटी दगडूशेठ हलवाई गणरायाची प्रतिकृती असलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी मंडळातर्फे वेगवेगळे देखावे सादर करुन समाजाला चांगला संदेश देण्याचे काम मंडळ करत आहे.
सध्या स्पर्धेच्या युगात अडकलेल्या मानवाची परिस्थिती मंडळाने चलचित्राच्या माध्यमातून सादर केली आहे. यात आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी जातो. त्यानंतर तेथे नोकरी करतो व विवाहही करतो. तोपर्यंत आई-वडील वृध्द होतात.
यादरम्यान आलेल्या गणेशोत्सवासाठी त्याला दूरध्वनी करुन बोलावले जाते. मात्र, आता मला येण्यास जमणार नाही, असे तो सांगतो. पूजा करण्यासाठी रोबोट आणा, असे सांगतो. त्यामुळे माणसे जोडा, असा संदेश मंडळाने रोबोटच्या माध्यमातून दिला आहे.
हा चलचित्र देखावा येथील जादूगार प्रसाद ओक यांनी साकारला असून, दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती मूर्तीकार राकेश कदम यांनी साकारली आहे.
यासाठी मंडळाचे अध्यक्ष बापू साडविलकर, उपाध्यक्ष संतोष शिंदे, सचिव रविकांत सातपुते, खजिनदार वसंत निवाते, सल्लागार वलीद वांगडे, अनंत मोरे, शैलेश संसारे, कविता खंदारे, विलास बुरटे, सागर कदम, सचिन शिंदे, तुकाराम बेचावडे, विनायक सावंत, मोहन गोलामडे, दत्ताराम लोलम परिश्रम घेत आहेत.
१९८०ची परंपरा
चिपळूण नगर परिषद कर्मचारी सार्वजनिक मंडळाची १९८० साली स्थापना झाली. लोकमान्य टिळकांनी समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली. ही परंपरा चिपळूण नगर परिषदेने आजही जपली आहे. दरवर्षी काहीतरी वेगळेपण जपण्याचा हे मंडळ प्रयत्न करते.