नीलेश जाधव, मार्लेश्वर : गणेशोत्सव म्हटला की, सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे भाव पाहावयास मिळतात. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करीत असतो. याला संगमेश्वर तालुक्यातील गोठणे पुनर्वसित ग्रामस्थांचाही अपवाद नाही. मात्र, व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली हातीव गावठाण या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, पुनर्वसनस्थळी वीज नसल्यामुळे सुमारे ८२ कुटुंबियांवर यावर्षीही गणेशोत्सव अंधारातच साजरा करण्याची वेळ आली आहे. पुढील वर्षीपासून अंधार दूर होऊन विद्युत रोषणाईच्या साथीने आणखी जल्लोषी वातावरणात गणेशोत्सव साजरा करायला मिळेल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.तालुक्यातील सह्याद्रीच्या टोकावर अतिशय दुर्गम भागात गोठणे गाव वसले होते. या गावात सुमारे २०७ कुटुंब पिढ्यान्पिढ्या राहात होती. मात्र, १९८४ साली केंद्र सरकारने गावात व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली. व्याघ्र प्रकल्प जाहीर होताच गावाच्या पुनर्वसनाची हालचालही सुरु झाली होती. पुनर्वसन केव्हा होणार? याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर पुनर्वसनासाठी २०१२ साल उजाडले आहे.मे महिन्यामध्ये गावातील काही कुटुंबांचे कोल्हापूर जिल्ह्यातील जैनापूर येथे, तर सुमारे ८२ कुटुंबाचे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील हातीव गावठाण येथे प्रशस्त जागेत पुनर्वसन झाले. मात्र, अद्याप या ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. या ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्रामस्थांना गोठणे गावात असल्यासारखे जीवन जगावे लागत आहे. अशा अवस्थेतसुद्धा हे ग्रामस्थ आपले आयुष्य जगत आहेत.सध्या गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने गोठणे पुनर्वसित ग्रामस्थांनीसुद्धा आपापल्या घरी लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. या ग्रामस्थांची गणपती बाप्पावर अपार श्रद्धा आहे. पुनर्वसनस्थळी वीज नसल्यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही ग्रामस्थांना गणरायासाठी विद्युत रोषणाई करता आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत. परंतु त्यांची लाडक्या गणरायाप्रती असणारी भक्ती जराही कमी झालेली नाही. उलट ग्रामस्थ गणरायाच्या पूजेत दंग झाले आहेत.प्रत्येकजण बाप्पाची पूजा- अर्चा करण्यात मग्न झाला आहे. त्यामुळे हातीव गावठाणमधील वातावरण सध्या भक्तीमय होऊन गेले आहे. येथील ग्रामस्थ बाप्पाच्या सेवेत तल्लीन झाले आहेत. पुढच्या वर्षी येथील अंधाराचे चित्र बाप्पाच बदलेल व पुढच्या वर्षीपासून गणेशोत्सव विद्युत रोषणाईच्या झगमगाटात साजरा करण्याची संधी मिळेल, असे ग्रामस्थांना मनोमन वाटत आहे. (गुरुवारी) लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार असून, पुढच्या वर्षीपासून तरी हा अंधार दूर व्हावा, असे गाऱ्हाणे ग्रामस्थ घालणार आहेत.
प्रकल्पग्रस्तांचा गणेशोत्सव यंदाही अंधारातच!
By admin | Published: September 02, 2014 11:25 PM