पावस : रत्नागिरी तालुक्यातील कुंभारघाटी ते गणेशगुळे फाट्या दरम्यान बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ला केला. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. यात गणेशगुळेचे सरपंच संदीप शिंदे जखमी झाले आहेत. पण त्यानंतर बिबट्याने थोड्या थोड्यावेळाने काहीजणांवर हल्ला केला. यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सरपंच शिंदे आणि विश्वास सुर्वे हे घरी निघाले होते. गणेशगुळेला जात असतानाच बिबट्याने हल्ला केल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांना पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी निखिल साळवी व बळीराम जोशीलकर याच्यावर बिबट्याने हल्ला केला. पुन्हा थोड्या वेळाने मेरवी गावचे रहिवासी निलेश म्हाद्ये यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले.याच मार्गावर पुन्हा काही मिनिटांनी कशेळी येथील ग्रामस्थ नीलेश नाटेकर, मंजुनाथ आदी यांच्यावर बिबट्याचा हल्ला झाला. हल्ला करणारे दोन बिबटे असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.या सर्व जखमींवर पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. पाठोपाठ हल्ल्याच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही बिबट्याने हल्ला करून अनेक दुचाकीस्वारांना जखमी केल्याच्या घटना गेल्या तीन महिन्यात घडल्या आहेत. आतातरी वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. उशिरा आलेल्या माहितीनुसार वनविभागाने घटनास्थळी 2 पथक पाठविल्याचे सांगितलेसीसी कॅमेऱ्याद्वारे वॉचगेले महिनाभर गणेशगुळे फाटा आणि कुडते येथे वनखात्याने दोन पिंजरे लावून ठेवले आहेत. तसेच येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे बिबट्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे, मात्र अद्याप बिबट्या जेरबंद करण्यात यश आलेले नाही.