रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षीपासून उत्सवावर निर्बंध आणण्यात आले आहेत. यावर्षीही कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. घरगुती गणेशमूर्तीची उंची दोन फूट तर सार्वजनिक गणेशमूर्तीची उंची चार फुटापर्यंतच ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
वर्षभर ज्यांच्या आगमनाची आतुरता लागून राहते, त्या गणपतीबाप्पाचे आगमन दि. १० सप्टेंबर रोजी होणार आहे. जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ६६० खासगी आणि १०८ सार्वजनिक बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. उत्सव काळातही सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षी मिरवणुकांवर बंदी आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगमुळे मूर्तीच्या उंचीवरही मर्यादा आली आहे. गणेशोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वत्र पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात १०८ ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनीही मंडपात गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेत सोशल डिस्टन्सिंग राखावे. मंडपात निर्जंतुकीकरण करण्यात यावे. यावर्षी आगमन व विसर्जन मिरवणुकांना बंदी असून, साधेपणाने उत्सव साजरा करण्यात यावा. भक्तांनी मास्कचा वापर करावा.
सजावटीमध्ये कोणताही भपकेबाजपणा असता कामा नये. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करताना, गर्दी होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. शाडूची मूर्ती असेल तर शक्यतो घरच्या घरी, मंडळांनी कृत्रिम तलाव करून मूर्तीचे विसर्जन करावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शक्यतो भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटर सुविधा उपलब्ध करण्यात यावी.
गणेशमूर्ती तयार करणाऱ्या व्यावसायिकांनीही गणेशमूर्ती उंचीबाबत शासनाच्या मर्यादेचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मूर्तिकारही शासनाच्या आदेशाचे पालन करत गणेशमूर्ती दोन ते चार फुटापर्यंतच रेखाटत आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळांचा सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य जनजागृती, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर भर आहे.