रत्नागिरी : उद्योग- धंद्यासाठी घेतलेले २ लाख ८६ हजार रुपये परत न करता मित्राची फसवणूक केली. याप्रकरणी एका विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना सन २०१३ ते २०२० या कालावधीत घडली आहे.
जनक नवीनचंद्र पटेल (रा. जामनगर, गुजरात) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात संभाजी हरिभाऊ शिंदे (४०, रा. तांबटआळी, रत्नागिरी ) यांनी शनिवार १८ सप्टेंबर रोजी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, जनक पटेल याने संभाजी शिंदे यांच्या मैत्रीचा फायदा घेत उद्योगधंद्यासाठी वेळोवेळी आणि वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे भरण्यास सांगितले. संभाजी यांनी त्याच्याकडे आपल्या पैशांची मागणी केली असता पटेलने खोट्या चेकचे फोटो पाठवून त्यांची फसवणूक केली. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.