रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शासनाने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्ला - आंबेशेत गावातील मिरवणुकीने न नेता साधेपणाने नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या ३३ वर्षांची देखण्या मिरवणुकीची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित होणार आहे.जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. घरोघरी गणेशमूर्तीचे आगमन होते. कर्ला-आंबेशेत गावातील गणेशमूर्ती एकत्रित मिरवणुकीने शहरातून गावामध्ये नेण्यात येतात. ढोलपथक, लेझीम पथक, भजन मंडळ, जाखडी, कोळी नृत्य, दांडिया आदी विविध कला प्रकारांचा समावेश असलेली मिरवणूक सकाळी ९ वाजता गाडीतळ येथून सुरू होते. पाच ते सहा तास ही मिरवणूक सुरू असते.गोखलेनाका, राधाकृष्ण नाका, रामनाका, एस. टी. बसस्थानक, जयस्तंभ, आंबेडकर पुतळा, निवखोल, आदमपूर, कर्ले, मारूती मंदिर, आंबेशेत शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात येते. स्थानिक व मुंबईकर भाविक बहुसंख्येने मिरवणुकीत सहभागी होत असतात. गावातील मुस्लिम बांधवांकडूनही दरवर्षी मिरवणुकीचे स्वागत केले जात असल्याने हिंदू-मुस्लिम ऐक्य यावेळी निदर्शनास येते.यावर्षी ३३ वर्षांनंतर प्रथमच मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे बाप्पांचे आगमन मिरवणुकीऐवजी साधेपणाने होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सामाजिक भान म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
गणपती मिरवणूक कोरोनामुळे रद्द, कर्ला-आंबेशेतची ३३ वर्षांची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 4:17 PM
कर्ला - आंबेशेत गावातील मिरवणुकीने न नेता साधेपणाने नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या ३३ वर्षांची देखण्या मिरवणुकीची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित होणार आहे.
ठळक मुद्देआगमनाची मिरवणूक कोरोनामुळे रद्द वाजत जागत आणले जातात गणपती