रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचबराेबर मंदिर परिसरातही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. मंदिर परिसर व समुद्रकिनारा येथे २४ तास सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. पोलिस प्रशासनाच्या सुचनेनुसार, गणपतीपुळे देवस्थानकडून किनाऱ्यावर पाच आणि मंदिर परिसरात तीन असे एकूण आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. किनाऱ्यापासून खोल समुद्रात साधारणपणे दोनशे मीटर आतील दृश्य ही कॅमेरे टीपू शकणार आहेत.श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे वर्षभर पर्यटकांची रेलचेल सुरू असते. पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक भक्तगण अंगारकी, संकष्ट चतुर्थीला येथे येतात तर मुंबई-पुण्यासह बेळगावमधून शनिवार, रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक दाखल हाेतात. भौगोलिक रचनेमुळे आणि समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमुळे येथील किनारा पोहण्यासाठी धोकादायक म्हणून ओळखला जाताे. या ठिकाणी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यूही झाला आहे.गेल्या काही दिवसांमध्ये पोलिस, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत यांच्यासह देवस्थानकडून केलेल्या उपाययोजनांमुळे बुडण्याच्या घटनांना आळा बसला आहे. बोटिंग सुरू झाल्यामुळे हा किनारा अधिक सुरक्षित झाला आहे. मात्र, पर्यटकांची वाढती गर्दी पाहता या किनाऱ्यावरील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकुर्णी यांच्या सुचनेनुसार, जयगड पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर यांनी गणपतीपुळे देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी संर्पक साधला होता. त्यानुसार मागील आठवड्यात किनाऱ्यावर पाच कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचबराेबर मंदिर परिसरातही तीन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागावर आता करडी नजर राहणार आहे.