गणपतीपुळे : पंख्यामध्ये जाळे अडकल्यामुळे मासेमारी नौकेच्या खडकावर आपटून फुटल्याची घटना गुरूवारी पहाटे गणपतीपुळे समुद्रकिनारी निसणघाटी येथे घडली. या नौकेवरील १० खलाशी बचावले असून, सतर्कता दाखवून त्यांनी नौकाही वाचवली आहे. ही नौका साखरतर येथील आहे. या दुर्घटनेत नौकेचे सुमारे १० ते १५ लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे.साखरतर येथील मेहताब साखरकर यांच्या मालकीची बोट गुरुवार दिनांक १९ रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास मासेमारी समुद्रात गेली होती. समुद्रात सोडलेले जाळे ओढत असतानाच ते नौकेच्या पंख्यामध्ये अडकल्याने बोट अचानक बंद पडली.इंजिन बंद पडल्यामुळे नौका लाटांच्या तडाख्याने गणपतीपुळे - निसनघाटी या ठिकाणी येऊन आदळली. त्यामुळे त्यावरील लाखो रुपयांची मासळी वाहून गेली. बोट खडकावर आदळून मधोमध मोठी चीर गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या बोटीवरील सर्वच्या सर्व १० खलाशी सुखरुप असून, नौकेवरील जाळी काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते. नुकसानग्रस्त नौका व अडकलेले जाळे काढण्यासाठी भंडारपुळेतील स्थानिक ग्रामस्थ व गणपतीपुळे येथील वडापाव विक्रेते व इतर व्यावसायिकांनी विशेष सहकार्य केले.
ही घटना समजताच जयगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक भोये यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे गावीत, मधुकर सलगर, प्रशांत लोहळकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त बोटीची पाहणी केली.