लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महापूर ओसरल्यानंतर घाईघाईत उचललेला कचरा शहरातील पवन तलाव मैदान येथे टाकण्यात आला. आता हाच कचरा चिपळूणकरांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. अजूनही सुमारे १५ हजार टन कचरा बाकी असून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे तीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातच शिवसेनेचे नगरसेवक उमेश सकपाळ यांनी कचरा प्रकल्पाकडे यापुढे एकही गाडी जाऊ देणार नाही, असा इशारा दिल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. त्यामुळे आता चिपळुणातील कचऱ्यावरून नवा वाद धुमसू लागला आहे. याप्रश्नी नगर परिषदेची विशेष सभा २५ ऑगस्ट रोजी होणार आहे.
महापुरात तब्बल तीस हजारांहून अधिक टन कचरा शहरात वाहून आला. मुंबई, ठाणे व नवी मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिक यंत्रणेसह मदतीचा हात देऊन हा कचरा उचलला. हा उचललेला सर्व कचरा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पवन तलाव मैदान येथे टाकला आहे. सद्यस्थितीत याठिकाणी १० हजार टनहून अधिक कचरा साचलेला आहे. याशिवाय अजूनही शहरात नाले व गटारे साफसफाईचे काम सुरू असून, त्यातून पाच हजार टनहून अधिक कचरा व गाळ जमा होणार आहे. त्यामुळे सुमारे पंधरा हजार टन कचऱ्यासाठी शिवाजीनगर येथील डोंगरमाथ्यावर असलेल्या नगर परिषदेच्या कचरा प्रकल्पाची जागा हा एकमेव पर्याय राहिलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा शिवाजीनगर येथे नेणे खर्चिक असल्याने शहरातील विविध प्रभागांत आरक्षित असलेल्या जागेत खड्डे काढून कचरा गाडण्याचा विचार केला जात आहे. परंतु, स्थानिक नगरसेवकांमधून त्यालाही काहींचा विरोध होत आहे. तसेच पवन तलाव मैदान हे शहरातील एकमेव मैदान सुस्थितीत असल्याने नगरसेवकांमधून तेथेही खड्डे काढण्यास विरोध केला जात आहे.
कचऱ्याच्या विषयावरून कोंडीत सापडलेल्या प्रशासनापुढे शिवाजीनगर कचरा प्रकल्पाची जागा हा एकमेव पर्याय राहिला आहे. मात्र, शिवसेना नगरसेवक उमेश सकपाळ यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. काही झाले तरी इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा शिवाजीनगरला नेऊ देणार नाही. यापुढे एकही गाडी कचरा प्रकल्पाकडे जाणार नाही, असाही इशारा दिला आहे. त्यामुळे नेमके करावे काय, असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. तर पवन तलाव मैदानाच्या परिसरातील नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत.
------------------------
ग्रामीण भागातूनही होतोय विरोध
चिपळूण शहरातील कचऱ्याला ग्रामीण भागातूनही विरोध होत आहे. काही दिवसांपूर्वी कामथे येथे कचरा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेथील ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या परत पाठवल्या. त्यानंतर शहरालगतच्या खेर्डी एमआयडीसी येथील जागेत प्रयत्न केला, मात्र तेथेही विरोध झाला तेव्हा आता अन्य गावांमध्ये चौकशी केली जात आहे. त्यासाठी शिवसेना नगरसेवक उमेश सकपाळ यांनीही पुढाकार घेतला आहे.
---------------------------
नगरसेवक उमेश सकपाळ यांनी घेतलेली भूमिका चुकीची नाही. शिवाजीनगर येथील डोंगरमाथ्यावर टाकलेला कचरा व त्यावर पडणारे पावसाचे पाणी पुन्हा नाल्याद्वारे नदीला येऊन मिळत असल्याने व त्याला स्थानिकांचा विरोध असल्याने ही भूमिका घ्यावी लागली आहे. अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करण्यासाठी तेही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कचऱ्याच्या गाड्या रोखण्याची वेळ येणार नाही.
जयश्री चितळे, गटनेत्या, शिवसेना.
-----------------------------
शिवाजीनगर येथे कचरा प्रकल्पाची सहा एकर जागा असून, ती पुरेशी आहे. मात्र त्याठिकाणी केवळ कचरा न टाकता त्याचे विघटनही करणे आवश्यक आहे. तूर्तास कचरा उचलणे अजून किती बाकी आहे, याचा अंदाज घेतला जात आहे. त्यानुसार निर्णय घेणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत कचरा उचलण्यासाठी किमान तीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, चिपळूण नगर परिषद.