रत्नागिरी : रत्नागिरी शहरात रोज संकलित होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण २२ टनापेक्षा अधिक असल्याने जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारातील जागेत या कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. या कचऱ्याचे करायचे तरी काय, असा प्रश्न पालिकेसमोर आहे. कचरा समस्येबाबत मार्ग काढण्यात रत्नागिरी पालिकेला अपयश आल्याने रत्नागिरीच्या प्रतिष्ठेचा ‘कचरा’ होण्याची वेळ आली आहे. शहरातील विविध भागांतील नागरिकांनीही शहर कचरामुक्त न करण्याचा विडाच उचलला आहे काय, असा सवालही केला जात आहे. रत्नागिरी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. अपार्टमेंटसची संख्या वाढते आहे. पालिकेकडूनही अपार्टमेंटसच्या बांधकामांना भारंभार परवानगी दिली जात आहे. आवश्यक सुविधा संबंधित बिल्डर्स देतात की नाही, याची शहानिशाही केली जात नाहीे. ही परवानगी देताना कागदोपत्री अटी शर्तींचे पालन करणार असल्याचे दाखविले जाते. प्रत्यक्षात सांडपाणी, कचरा याचे काय करणार, याबाबत कसलाच आराखडा बिल्डर्सकडे वा पालिकेकडेही नाही. त्यामुळेच कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करीत आहे. अपार्टमेंटसच्या शेजारील ठिकाणे ही कचऱ्याची केंद्र बनली आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहणे हे नित्याचे झाले आहे. एकीकडे स्वच्छतेचे आव्हान, तर दुसरीकडे वाढत जाणाऱ्या कचऱ्याच्या ढिगांमुळे पालिकेला हे कचऱ्याचे ओझे जड झाले आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या खत प्रकल्पासाठी पालिकेला गेल्या पाच वर्षांपासून जागाच उपलब्ध होत नसल्याने प्रकल्पासाठी शासनाकडून आलेला लाखो रुपयांचा निधीही अन्य कामांसाठी वापरण्यात आला आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, विज तयार करणे यासारखा भुलभुलय्या पालिकेकडून शहरवासियासमोर उभा करण्यात आला. प्रत्यक्षात या प्रकल्पांंच्या कार्यवाहीसाठी पाउलही पुढे पडले नाही. रत्नागिरी शहरातीलच तीन ठिकाणी कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्पासाठी जागांची पाहणी करण्यात आली होती. त्यातील एक वा दोन जागांवर कचऱ्यावर प्रक्रिया करणारे छोटे प्रकल्प उभारण्यात येणार होते. परंतु कचऱ्याचा प्रकल्प आपल्या प्रभागात नको, अशी भूमिका तेथीलच नगरसेवकांनी घेतल्याने हे प्रकल्पही बारगळले. खरेतर कचऱ्याची ही समस्या रत्नागिरी पालिकेत आजवर सत्तेवर आलेल्या पदाधिकाऱ्यांमुळेच निर्माण झाली आहे. कचरा समस्या सोडविण्याबाबत त्यांची मानसिकताच नसल्याने शहरासमोरील कचरा समस्या गंभीर झाली आहे. (प्रतिनिधी)दांडेआडोम कचरा प्रकल्प फसला!दांडेआडोममध्ये कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्पासाठी पालिकेकडून जागा खरेदी करण्यात आली आहे. मात्र, तेथील लोकांनी त्या जागेपर्यंत जाण्यासाठी रस्त्याला जागा न दिल्याने तो प्रकल्प होऊ शकला नाही. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनीही दांडेआडोम प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. प्रकल्पाच्या जागेपर्यंत जाण्यासाठीचा मार्ग मोकळा करण्याच्या हालचाली झाल्या. नंतर माशी कुठे शिंकली त्याचा शोध सुरू आहे. साळवी स्टॉपच का? रत्नागिरी शहरात संकलित होणारा संपूर्ण कचरा शहराचे नाक असलेल्या साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात डम्प केला जात आहे. त्यामुळे जलशुध्दिकरण प्रक्रियेवरही दुष्परिणाम होत आहे.कचऱ्याचे ढिग रोज पेटवून देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे साळवी स्टॉप परिसरात सायंकाळी धुराचे साम्राज्य निर्माण होते. कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना रोज करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या स्थितीत साळवी स्टॉप येथे कचऱ्याचे ढीग नकोच. आम्हीच काय शहराचा कचरा सांभाळायचा ठेका घेतलाय काय, अशा तीव्र प्रतिक्रीया तेथील नागरिकांतून उमटत आहेत.
रत्नागिरीत कचराच कचरा...
By admin | Published: November 25, 2014 10:27 PM