नगरसेवक निशिकांत भोजने यांची माहिती
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरातील पवन तलाव मैदानावर संकलित केलेला कचरा बहादूरशेखनाका, शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्प आणि पवन तलाव मैदानावर कचरा ठेवण्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. येथे दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यकता आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या सहा आरक्षित जागेत खड्डे खोदून त्यात कचरा टाकण्याच्या सूचना प्रशासनाला बुधवारी झालेल्या सभेत केल्याची माहिती नगरसेवक निशिकांत भोजने यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितली.
याविषयी माजी उपनगराध्यक्ष व भाजपचे विद्यमान नगरसेवक निशिकांत भोजने म्हणाले की, शिवसेनेचे सदस्य उमेश सपकाळ यांनी शिवाजीनगर येथे, तर आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी बहादूरशेख नाका येथील नगर परिषदेच्या जागेत कचरा ठेवण्यास विरोध दर्शवला होता. सपकाळ व मोदी यांच्या भावना बरोबर आहेत. बुधवारच्या सभेत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावरून अन्य नगरसेवकांनीही विविध मतमतांतरे व्यक्त केली. शहरातील पवन तलाव मैदानावर कचऱ्याचे ढिगारे साठल्याने त्या परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. त्यामुळे संकलित केलेल्या कचऱ्याचीही त्वरित विल्हेवाट लावावी लागणार आहे. यासाठी शहरात नगर परिषदेच्या आरक्षित असलेल्या जागेत खड्डा खोदून तेथे कचरा टाकण्याचे नियोजन आहे. शहरात बहादूर शेख नाका, ऊक्ताड, काविळतळी, रामतीर्थ तलाव आणि पालोजी रोड येथे नगर परिषदेच्या सहा ठिकाणी मोठ्या आकाराच्या जागा आहेत. तेथे खड्डे खोदून कचरा काढण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. कचरा उचलण्यासाठी व खड्डे खोदण्याकरिता आवश्यक असलेली यंत्रसामग्री आणली आहे. मात्र कचरा टाकायचा कोठे याचा निर्णय होत नाही. गेल्या तीन चार दिवसापासून ही यंत्रणा जागेवरच बसून आहे. त्याचे लाखोंचे भाडेही नगर परिषदेला मोजावे लागत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला संकलित केलेल्या कचऱ्याची कोणत्याही स्थितीत विल्हेवाट लावण्याची आवश्यकता असल्याचे मत भोजने यांनी स्पष्ट केले. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू, रसिका देवळेकर उपस्थित होत्या.