राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील खरवते फाटा येथे रस्त्यानजीक शनिवारी गवारेडा मृतावस्थेत आढळला. महामार्गाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुमारे चार वर्षांचा नर जातीचा हा गवारेडा असून, त्याची लांबी २९० सेंटिमीटर. तर उंची १४२ सेंटिमीटर आहे. त्यांची शिंगे ४८ सेंटिमीटर लांब असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
खरवते ग्रामपंचायतीचे सदस्य दिलीप चौगुले आणि काही ग्रामस्थ तेथून जात असताना रस्त्यानजीकच्या परिसरामध्ये मृतावस्थेमध्ये गवारेडा पडल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ सरपंच दिनेश चौगुले यांना माहिती दिली. त्यांनी वनविभागाचे राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे यांच्याशी संपर्क साधून कळवले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना माहिती देताच राजापूरचे माहिती वनरक्षक सागर गोसावी, सहकारी विजय म्हादये, दीपक म्हादये आदी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गवारेड्याची पाहणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर वनविभागाने माजी सरपंच दयानंद चौगुले, सरपंच दिनेश चौगुले, श्रीकांत चौगुले, नितीन गुरव आदींसह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृत गवारेड्याची विल्हेवाट लावण्यात आली.