रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरी विभागाने जिल्ह्यात सांघिक कारवाई केली. यात गावठी दारूभट्टी आणि गोवा बनावट मद्याचे २०० बाॅक्स जप्त करण्यात आले. २६ लाख १४ हजार ३९० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.रत्नागिरी शहरालगत, पाटीलवाडी व नाखरेवाडी परिसरांत हातभट्टीविरोधी धडक कारवाई करत गावठी दारू ४० लिटर, रसायन ७००० लिटर (३५ बॅरल) जप्त करून नष्ट केले. या मोहिमेत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या हातभट्टी, रसायन, दारू व इतर साहित्याची किंमत सुमारे १,६८,३९० इतकी आहे.तसेच लांजा निरीक्षकांच्या पथकाने कोर्लेच्या (ता. लांजा) हद्दीत मुंबई महामार्गावरवर गस्त घालत असताना गोव्यावरून मुंबईला जाणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी केली असता सुमारे २०० बॉक्स सापडले. ते जप्त करण्यात आले असून चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. जप्त मुद्देमालामध्ये गोवा बनावटीच्या मद्याची किंमत ९५,३६,००० इतकी असून जप्त केलेल्या वाहनांची किंमत अंदाजे नऊ लाख इतकी आहे. जप्त करण्यात आलेले मद्य, वाहन व आरोपीच्या ताब्यातील इतर साहित्याची एकूण किंमत २४,४६,००० आहे.ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव विशाल रघुनाथ तुपे (रा. खेराडे, तुपेवाडी (विटा), ता. कडेगाव, सांगली) असे आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून लांजा न्यायालयात हजर करण्यात आले आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता), सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार कोल्हापूर विभागाचे उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी तसेच रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनात झाली. लांजाचे निरीक्षक विक्रमसिंह मोरे यांनी केली असून, सुधीर भागवत व व्ही. पी. हातिसकर (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लांजा), एस. बी. विटेकर (जवान-नि-वाहनचालक) यांनी ही कारवाई केली. पुढील तपास निरीक्षक विक्रमसिंह मोरे करीत आहेत.
नवीन आर्थिक वर्षामध्ये अवैध मद्यावर अंकुश ठेवून शासनाचा महसूल वाढवण्याच्या दृष्टीने या विभागाचा प्रयत्न असून हातभट्टीवर विशेष कारवाया करण्यात येणार आहेत. अवैध दारूस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर असलेली जिल्हास्तरीय समितीदेखील याबाबत बेळोबेळी आढावा घेणार आहे. पोलिस विभाग व राज्य उत्पादन शुल्क, विभाग अवैध दारूविरोधी लवकरच एकत्रित मोहीम हाती घेऊन ’हातभट्टीमुक्त गाव’ ही संकल्पना जनसहभागातून राबविणार आहे. - सागर धोमकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी