चिपळूण : कुणबी शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२९) सकाळी १०.३० वाजता खेर्डी येथील स्व. माधवराव बाईत वसतिगृहात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी संस्थेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे तसेच अन्य इतर महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना मदत
रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातीतील विविध परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविले आहे. अशांचा सत्कार कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे करण्यात येणार आहे. १० वी परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त आणि १२ वी परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.
विखे-पाटील यांची जयंती
दापोली : असोेंड व रुखी या दोन्ही गावांमध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांची जयंती शेतकरी दिन म्हणून साजरी करण्यात आली. कृषी सहाय्यक उदय बंगाल यांनी डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी कृषी योजनांविषयीही माहिती दिली. जिल्हास्तरावर भातपीक स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त महेंद्र पड्याळ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
वार्षिक सर्वसाधारण सभा
गुहागर : तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या संस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२९) आयोजित करण्यात आली आहे. ही सभा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून आयोजित केली आहे. या सभेत सभासदांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाचे वेध
मंडणगड : गणेशोत्सवाला आता थोडे दिवसच शिल्लक राहिले आहेत. कोरोनामुळे तणावाखाली असलेल्या नागरिकांना आता बाप्पांचे वेध लागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वत्र आर्थिक मंदी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या आगमनानंतर कोरोनाचे अनिष्ट संकट दूर होईल, असा विश्वास भक्तांना वाटत आहे.