मेहरून नाकाडे
रत्नागिरी : आरामदायी व आलिशान प्रवासाच्या शिवशाहीनंतर रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात अॅल्युमिनियम बांधणीऐवजी माईल्ड स्टील पोलादी बांधणीच्या लालपरी दाखल झाल्या आहेत. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील तीस विभागात एकूण १३०० नवीन लालपरी दाखल होणार आहेत. त्यापैकी रत्नागिरी विभागात ५0 ते ६0 गाड्या दाखल होणार आहेत.
पारंपरिक अॅल्युमिनियमऐवजी हलके परंतु मजबूत अशा माईल्ड स्टीलचा वापर गाडीच्या बांधणीसाठी करण्यात आला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणेजवळील दापोडी कार्यशाळेत मजबूत स्टील बांधणीच्या बसेसची निर्मिती करण्यात आली आहे. प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देत या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे.एस. टी.च्या साध्या गाडीचे रूपांतर लालपरीमध्ये करण्यात आले आहे. या एस. टी.च्या बांधणीमध्ये अॅल्युमिनियमऐवजी हलके पोलाद वापरल्याने बसच्या खिडक्यांचा धडधड आवाज येत नाही. ४२ आसनी बस असलेल्या या गाडीला संकटकालीन दोन मार्ग आहेत.
संकटकालीन खिडक्यांच्या जागी असलेली आसने काढण्यात आली आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत पुढे व मागे असे दोन मार्ग प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमावलीनुसार लालपरीची बांधणी करण्यात आली आहे.एस. टी.ची साधी गाडी साडेसहा वर्षे वापरल्यानंतर ती लालपरीमध्ये रूपांतरीत करण्यात आली आहे. सध्या दापोडी (पुणे), नागपूर व औरंगाबाद कार्यशाळेत लालपरीची बांधणी करण्यात येत आहे. रत्नागिरी विभागात सध्या १५ लालपरी दाखल असल्या तरी त्या आंतरराज्य मार्गावर चालविण्यात येत आहेत.
एशियाडप्रमाणे या गाडीतील बैठक व्यवस्था आरामदायी आहे. टू बाय टू आसनी बैठक व्यवस्था आहे. सरकत्या काचांच्या खिडक्या असून, आकारानेही मोठ्या आहेत. चालकाची केबीनही प्रशस्त असून, चालकाशेजारीच वाहकाची सीट आहे. चालकासमोरील काच लक्झरीप्रमाणे मोठी आहे.लालपरीचा दरवाजा पुढच्या बाजूला असून, बसची अंतर्गत रचनादेखील आकर्षक आहे. त्यासाठी अॅक्रेलिक शीटचा वापर करण्यात आला आहे. लक्झरीबसप्रमाणे सामान सुविधा एस. टी.च्या मागच्या बाजूला सुरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे एस. टी.च्या टपावर सामान ठेवणे कालबाह्य होणार आहे.
सुरक्षिततेची खबरदारी म्हणून दोन अग्निशमन उपकरणे बसमध्ये ठेवण्यात आली आहेत. पूर्वीप्रमाणे बसचा मार्ग दाखविणारे बोर्ड आता पत्र्याऐवजी एईडी दिव्यांचे आहेत. संपूर्ण बसची बांधणी करतानाच प्रवांशाच्या सुरक्षिततेचा विचार करण्यात आला आहे.आरामदायी गाड्याखासगी प्रवासी वाहतुकीला तोंड देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही गाड्या सेवेत आणल्या. आरामदायी प्रवास, वायफाय सुविधामुळे ही गाडी प्रवाशांना भावली असून, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. खासगी कंपनीकडून महामंडळाने १५०० गाड्या चालविण्यासाठी घेतल्या. परंतु व्यवस्थापनातील त्रुटींमुळे शिवशाहीबद्दल प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या.
शिवशाहीमुळे एस. टी.ला फायद्याऐवजी तोटाच अधिक होत असल्याचे लक्षात येताच महामंडळाने आता स्वत:च्याच शिवशाही बसेस आणण्याचे ठरविले असून, तशा पध्दतीने बांधणी केलेल्या आरामदायी गाड्या काही दिवसातच महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.गतवर्षी शिवशाहीवगळता प्रायोगिक तत्त्वावर लालपरी रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. त्या लालपरीला प्रवाशांनी पसंती दर्शविल्याने येत्या तीन वर्षात ८० टक्के लालपरी असणार आहेत. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील तीस विभागात एकूण १३०० नवीन लालपरी दाखल होणार आहेत.
सध्या महामंडळाच्या तीन कार्यशाळांतून माईल्ड स्टील गाड्यांची बांधणी सुरू आहे. जसजशा गाड्या तयार होतील, त्याप्रमाणे प्रत्येक विभागाच्या मागणीनुसार दिल्या जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने लालपरी दाखल होणार आहेत.- विजय दिवटे,प्रभारी विभाग नियंत्रक, रत्नागिरी.