राजापूर : गेली अनेक वर्षे राजापूर तहसील कार्यालयाच्या आवारात वापराविना जनरेटर पडून आहे. या जनरेटरबाबत कुठलाच निर्णय होत नसल्याने आणखी किती काळ तो जनरेटर तेथेच पडून राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राजापूर तहसील कार्यालयाशी व्हीसीव्दारे संपर्क साधताना कुठलीच अडचण येऊ नये, यासाठी येथील तहसील कार्यालयात खास बंदिस्त कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालयात होणाऱ्या व्हीसीसाठी कुठलाच व्यत्यय येऊ नये म्हणून तहसील कार्यालयाच्या आवारात एक अद्ययावत स्वरुपाचा जनरेटर आणून ठेवण्यात आला आहे. त्याला काही वर्षे लोटली आहेत. तहसील कार्यालयातील व्हीसीसाठी बनविलेला कक्षच सुरू न करण्यात आल्याने तो जनरेटर वापराविना पडून राहिला आहे.
याबाबत तहसील कार्यालयाकडे चौकशी केली असता, त्याचा विषय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्यापही याबाबत काेणतीच कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित जनरेटरची अवस्था आता बिकट होत चालली असून, तो सडण्याच्या मार्गावर आहे़