आवाशी : खेड तालुक्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांची देखभाल व काळजी घेण्यासाठी उभारण्यात अलेल्या लवेल येथील कोविड सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्यात जंतू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा दैनंदिन आकडा वाढत असताना उत्तर रत्नागिरी विभागात ही संख्या काहीशी नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. उत्तर भागातील खेड, दापोली, मंडणगड तालुक्यात रुग्णवाढीचा वेग खूपच मंदावल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास कदाचित हे तीन तालुके लवकरच कोरोनामुक्तीकडे वाटचाल करतील. एकीकडे ही समाधानकारक बाब असताना दुसरीकडे खेड तालुक्यात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमधून रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट विभागात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये मंगळवारी पिण्याच्या पाण्यात जंतू सापडल्याने रुग्णांमध्ये एकच खळबळ उडाली. याची माहिती तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली. या पिण्याच्या पाण्याच्या समस्येबरोबरच तिथे असणारी, टाॅयलेट बाथरुममधील विजेची समस्या, सात्विक आहार न मिळणे, अवेळी भोजन या सर्वच गोष्टींबाबत रुग्णांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. उशिराने वा निकृष्ट दर्जाचे भोजन मिळत असल्याची तक्रार येथील रुग्णांनी यापूर्वीच म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात कळवल्याचेही त्यांनी लोकमतला सांगितले. दुपारच्या भोजनाची वेळ एक वाजताची असूनही दोन ते अडीच वाजले तरी भाेजन मिळत आल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. या तक्रारीचीही दखल घेतली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर भोजन देताना सुरुवातीच्या एक दोन दिवस त्यामध्ये अंड्याचा समावेश असतो तर नंतर केवळ साधी भाजी पोळी व अपुरेच भोजन मिळत असल्याचे सांगण्यात आले.
येथील वाॅर्डातील कचरा कधी कधी दोन ते तीन दिवस साफ केला जात नसल्याचीही रुग्णांची तक्रार आहे. त्यामुळे योग्य उपचार मिळूनही अस्वच्छता, निकृष्ट आहार व अशुद्ध पाण्यामुळे रुग्णांचे आरोग्यमान धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
............................
सारे काही आलबेल
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजन शेळके यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता अशा कोणत्याही समस्या येथील कोविड सेंटरमध्ये नसून सर्वतोपरी रुग्णांची काळजी घेतली जात आहे. ज्या रुग्णांनी वरील तक्रार केली आहे त्यांची आम्ही प्रत्यक्ष भेट घेऊन इतरही रुग्णांकडेही विचारणा केली. मात्र यापैकी कुणीही अशी समस्या मांडली नाही. तरीही काही रुग्णांनी प्रसारमाध्यमांना अशी माहिती का द्यावी ही बाब उलगडत नसल्याचे डाॅ. शेळके यांनी सांगितले.