पतसंस्थेची सभा
खेड : शहरातील श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष संजय मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. यावेळी विविध विषयांवरती चर्चा केली जाणार आहे.
कोळंबे येथे मार्गदर्शन
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे-सोनगिरी समन्वय युवा सामाजिक संघटनेतर्फे कोळंबे येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. ॲड. विजय पाटील यांनी शेतजमिनीबाबत समस्या, कुळकायदा, लोकांची होणारी फसवणूक यासाठी ७/१२ वाचन व फेरफार याबाबत माहिती दिली.
पावसाची विश्रांती
रत्नागिरी : गणेशोत्सवात धो-धो कोसळणाऱ्या पावसाने गेले दोन दिवस चांगलीच विश्रांती घेतली आहे. कडकडीत ऊन पडत असून, उष्माही वाढला आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. अधूनमधून एखादी सर कोसळणे गरजेचे आहे. मात्र पाऊस नसल्याने पिकाला धोका निर्माण झाला आहे.
शिंदे यांना पुरस्कार
चिपळूण : येथील माजी सभापती धनश्री शिंदे यांना बेळगाव येथील नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे आंतरराज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांतर्गत दिला जाणारा हा सामाजिक सेवा पुरस्कार असून, खासदार अमरसिंग पाटील, केंद्रीयमंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.
अनुदानापासून वंचित
राजापूर : संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ वृद्धापकाळ सहायक योजनेतून तब्बल साडेचार हजार महिला लाभार्थी अनुदानापासून गेले तीन महिने वंचित आहेत. जूननंतर प्रतिमहा दिले जाणारे अनुदान अद्याप जमा झालेले नाही. ऐन गणेशोत्सवापूर्वी निराधार महिलांची गैरसोय झाली.
सुशोभीकरण करणार
राजापूर : शहरातील भटाळी परिसरातील वासूकाका जोशी पुलानजीक असलेल्या गणेश विसर्जन घाटाचा परिसर विकसित व सुशोभित करण्याचा मानस असल्याचे मत राजापूरचे नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी नुकतीच परिसराला भेट देऊन घाटाची पहाणी केली.
रवींद्र रेवाळे यांची निवड
खेड : तालुक्यातील मुर्डे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच रवींद्र रेवाळे यांची निवड करण्यात आली आहे. पंचवार्षिक कालावधीत सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात रेवाळे यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे याची दखल घेऊन सर्वानुमते निवड करण्यात आली.
टेबलटेनिस स्पर्धा
चिपळूण : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने टेबल टेनिस असोसिएशन ऑफ रत्नागिरीतर्फे २५ ते २७ सप्टेंबरअखेर जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या वयोगटात स्पर्धा होणार आहे.