रत्नागिरी : दिवसा कडाक्याचे ऊन असले तरी रात्रीच्या वेळी मात्र सध्या कोकण धुक्याची चादर ओढत आहे. त्यामुळे कोकणातील घाटांमध्ये आताच्या दिवसात रात्री आणि अगदी सकाळी सात वाजेपर्यंत धुक्याने हातपाय पसरलेले दिसतात. कोकणातील घाटांमधील धुक्याच्या वाटांमुळे प्रवासाचा वेग मंदावला असला तरी पर्यटकांच्या प्रवासातील गंमत वाढली आहे.
पावसाळा वेळेत संपला आणि ऑक्टोबर हीटनेही वेळापत्रक पाळले की नोव्हेंबर महिन्याची सुरुवात आंबा काजूच्या मोहराच्या दरवळाने होते. नोव्हेंबरपासून थंडीनेही आपले कामकाज वेळापत्रकानुसार केले तर डिसेंबरच्या मध्यावर कोकणात १७ ते १९ अंश इतके किमान तापमान असते. त्यामुळे मोहराला फलधारणा होते. हे दरवर्षीचे सर्वसाधारण वेळापत्रक. यंदा सप्टेंबरमध्ये पावसाने वेळापत्रकानुसार आपला गाशा गुंडाळला. ऑक्टोबर हीटही आदर्श विद्यार्थ्यासारखी नियमित वेळेत दाखल झाली आणि नियमित वेळेत परत गेली. हिवाळा मात्र नाठाळ विद्यार्थ्यासारखा वेळेवर आला नाही. ऑक्टोबर हीटनंतर आंबा काजूची कलमे मोहरली. त्या दरवळाने शेतकरी, बागायतदार, कोकणवासीय तृप्त झाले आणि यंदाच्या आंबा हंगामाला समाधानकारक सुरुवात झाली.
त्यानंतर मात्र हिवाळ्याने दंगामस्ती सुरू केली आणि तो वेळेवर आलाच नाही. डिसेंबर महिना निम्मा उलटून गेला तरी किनारपट्टीवरील तालुक्यांमध्ये पारा २२ अंशापेक्षा खाली उतरलेला नाही. दापोली, देवरुख सारख्या भागांमध्ये तापमान १५ ते १६ अंशापर्यंत खाली आले असले तरी ज्या भागात आंबा पीक मोठ्या प्रमाणात येते त्या किनारपट्टी भागात मात्र पारा अजून वरच आहे.
दिवसा 30 ते 32 अंश इतक्या कडक उन्हाचा अनुभव सध्या कोकणवासीय घेत आहेत अर्थात दिवसा कडक ऊन असले तरी रात्रीच्या वेळी मात्र चांगली थंडी अनुभवाला येत आहे. त्यामुळे मोहराला फलधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. रात्री ११ नंतर सकाळी सात वाजेपर्यंत हवेत चांगल्या प्रमाणात गारठा असल्याने मुंबई गोवा महामार्गावरील घाटांमध्ये सध्या धुक्याचे वातावरण आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवळी, बावनदी, संगमेश्वर यासारख्या नदीकिनारी असलेल्या महामार्गावरून नदीवर पसरलेले धुके पाहणेही आकर्षण ठरत आहे.