रत्नागिरी : महावितरणकडून ग्राहकांना डिजीटल सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. वीज बील भरण्यासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. त्याप्रमाणे जेवढ्या रकमेचे रिचार्ज तेवढी वीज वापर करता येईल, असे ‘स्मार्ट प्रीपेड वीज मीटर’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सुरूवातीला दोन लाख ‘स्मार्ट प्रीपेड वीज मीटर’ बसविण्यात येणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन लाख स्मार्ट प्रीपेड वीज मीटर मंजूर करण्यात आले आहेत. दिवाळीनंतर वीज मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. २७ महिन्यात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. स्मार्ट प्रीपेड वीज मीटर साठी इंटरनेट आवश्यक असल्याने शहरी भागात प्राधान्याने बसविण्यात येणार आहेत.वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी व वीज गळती कमी करण्यासाठी महावितरणने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मीटर रीडींग कंपनीकडून मीटरची अचूक नोंद न घेणे, छापील वीजबीले वेळेत न मिळणे यामुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप नवीन स्मार्ट मीटरमुळे वाचणार आहे.वीज मीटर सर्व्हरला जोडण्यात येणार असल्याने ग्राहकांनाही अद्यावत माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. स्मार्ट मीटरमुळे नेमका वीज वापर लक्षात येईल. त्यातून ग्राहक वीज बचतीबाबत दक्ष होतील. त्यांना वेळेत बिल भरण्याची सवय लागेल. त्यातून महावितरणची थकबाकी कमी होण्यास मदत होणार आहे.वीज मीटर लावणाऱ्या कंपनीकडे वीज ग्राहकांना आपला मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यावा लागणार आहे. त्यामुळे मीटर लावल्यावर ग्राहकांना वीजबिलाची माहिती मोबाईल किंवा ईमेलवर उपलब्ध होणार आहे. मोाबईलप्रमाणे वीज मीटरकार्डचे रिचार्ज करावे लागणार आहे. मोबाईलवरून घरातील वीजपुरवठा सुरू किंवा बंद करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. ज्यामुळे वीज बचतीस मदत होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन लाख स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्यास दिवाळीनंतर सुरूवात होणार आहे. सुरूवातीला शहरातील घरगुती ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. - स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता, महावितरण