लांजा : ओम्नी आणि दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकीवरील साडेतीन वर्षांची बालिका स्वरा संदीप मोरवसकर (रा. केळवली, लांजा) ही जागीच ठार झाली. दुचाकीस्वार, त्याची पत्नी व ओम्नीमधील प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले. शनिवारी सकाळी १०.१५ वाजता हा अपघात लांजा-बागेश्री येथे झाला. चारही जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकेड येथील प्रदीप पांडुरंग चव्हाण (वय २७) हे मोटारसायकल (एमएच ०८/एफ ७४९९) घेऊन पत्नी रजनी (२५, रा. वाकेड, ता. लांजा) आणि भाची स्वरा संदीप मोरवसकर यांना घेऊन वाकेडहून लांजाच्या दिशेने येत होते. शनिवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास लांजा येथील बागेश्री या ठिकाणी ते आले असता मुंबईहून देवगडच्या दिशेने जाणाऱ्या ओम्नी व्हॅनने (एम एच ०३ ए आर २४८४) पुढील गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला जोरदार धडक दिली. ही ओम्नी भास्कर भाऊ वाजगे (४०, रा. देवगड बापार्डे) हे चालवत होते.या अपघातात दुचाकीवरील बालिका स्वरा ही रस्त्यावर जोरात फेकली गेली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्राव होऊन ती जागीच मृत्युमुखी पडली. प्रदीप व त्यांची पत्नी रजनी, ओम्नीचालक भास्कर वाजगे, ओम्नीतील प्रवासी सुरेश चव्हाण हे चौघेही गंभीर जखमी झाले. चालक वाजगे यांचे पाय स्टेअरिंंगच्या खाली अडकले होते.अपघाताची खबर मिळताच पोलीस निरीक्षक मनोहर चिखले, उपनिरीक्षक पंडित पाटील, हेडकॉन्टेबल शशिकांत सावंत, संतोष झापडेकर, संदेश जाधव, चालक राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. फिरोज नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी ओम्नीमध्ये अडकलेले चालक वाजगे व प्रवासी सुरेश चव्हाण यांना बाहेर काढले. चारही जखमींना लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची खबर सचिन तुकाराम चव्हाण (रा. वाकेड) यांनी दिली. लांजा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
लांजात अपघातात बालिका ठार
By admin | Published: June 04, 2017 1:37 AM