लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्यातील सर्व अंशतः अनुदानित, अघोषित, त्रुटीअपात्र शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिदिनी रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शासनाच्या जाचक अटी व मनमानी कारभार याचा जाहीर निषेध करीत १०० टक्के अनुदानाची आग्रही मागणी केली आहे.
विनाअनुदानित शिक्षकांवर गेल्या २० वर्षांपासून सातत्याने अन्याय होत आहे. सर्वच विनाअनुदानित शाळा आज प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदानास पात्र असताना काहींना २० टक्के, तर काहींना ४० टक्के अनुदान देऊन शासनाने बोळवण केली आहे. बऱ्याच शाळांना अजून एक रुपयाही अनुदान नाही. जवळपास वीस वर्षे विनाअनुदानित शाळेत सेवा करून काही शिक्षक बिनपगारी निवृत्त झाले आहेत, तर काही येत्या एक-दोन वर्षात निवृत्त होतील.
भारतीय संविधानात सर्वांना समानतेची संधी असताना,‘समान काम - समान दाम’ या तत्त्वानुसार अनुदानित शिक्षकांप्रमाणेच विनाअनुदानित शिक्षकांना वेतन मिळणे हा आमचा केवळ हक्कच नसून तो आमचा अधिकार आहे. मात्र, शासन हेतुपुरस्सर आमच्या बाबतीत झोपेचे सोंग घेत असल्याने शासनाला झोपेतून जागे करण्यासाठीच संघटनेचे राज्यभरात ढोलवादन व घंटानाद आंदोलन करून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे निवेदन देऊन सर्व विनाअनुदानित शाळा यांना प्रचलित धोरणानुसार १०० टक्के अनुदान मिळावे. त्रुटी पूर्तता शाळा यांना निधीसह घोषित करून त्वरित अनुदान सुरू करणे तसेच अघोषित शाळा १०० टक्के निधीसह घोषित करणे, विनाअनुदानित शाळेतील कर्मचारी यांना सेवासंरक्षण मिळावे या आदी मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास येत्या १५ ऑगस्टनंतर राज्यभरातील सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हे आंदोलन महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मोरेश्वर लिंगायत, सचिव प्रकाश हर्चेकर, जिल्हा सल्लागार संदेश कांबळे, इम्रान अलवारे, विठोबा भोसले, मारुती कुर्ले, विजय महाले, अमोल चव्हाण, अन्सारी तौशिफ, जितेंद्र गजभार, अविनाश शिंदे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.