आलं ना हे असंच काहीतरी मनात. वाटलं ना हेल्प-लेस असल्यासारखं.. माझ्याही तोपर्यंत हे मनात होत जोपर्यंत मी नाशिकमध्ये राहणाऱ्या एका देवदूताची दानत ऐकली नव्हती. कोरोनावरील लस आल्यापासून कधी एकदा लस घेऊन सुरक्षित होऊ पाहणारे आपण आणि प्लाझ्मा देण्यासाठी सरळ नकार देऊन मोकळे होणारे आपणचं ! अशा या सगळ्या दयनीय परिस्थितीत मरण समोर दिसत असतानाही मृत्यूला स्वखुशीने आलिंगन देणं म्हणजे खरा आदर्श म्हणावा लागेल. ही हिम्मत दाखवली नाशिकमधल्या वय वर्ष ८५ असणाऱ्या दाभाडकर आजोबांनी !! एक महिला आपल्या पतीचा प्राण वाचविण्यासाठी बेड शोधत असलेली आजोबांनी बघितली आणि या सत्पुरुषाने आपला बेड त्याला देण्यासाठी हट्ट धरला. आजोबांचा हा हट्ट बघून घराच्यांसकट डॉक्टरांनाही नवल वाटलं. ‘मी समाधानाने जगलो, आता माझा हा बेड त्या तरुणाला द्या’ असं म्हणत आजोबांनी मनाचा मोठेपणा दाखवलाच शिवाय माणुसकी संपत चाललेय असं म्हणणाऱ्या समाजासाठी एक नवा आदर्श समोर ठेवला. सध्या देशाला माझ्यापेक्षाही तरुणपिढीची गरज आहे, असं म्हणत आजोबांनी देशाप्रती असणारं आपलं प्रेम व्यक्त केलंच पण त्याचवेळी, एकाचा जीव वाचविण्यासाठी दुसऱ्याला जीव द्यावा लागला हे कटू सत्यही मनाला पोखरून गेलं..! अणुबॉम्ब, दारू गोळा यांचा साठा करण्यात गुंतलेले आपण व्हेंटिलेटर आणि आरोग्य सुविधा विकसित करण्यामध्ये मात्र फार मागे पडलो नाही का ?
अगदी साध्या-साध्या केलेल्या गोष्टी मनात ठेवून अहंकाराच्या उशीखाली आपण स्वतः ला कुरवाळत बसतो. आजोबांनी दाखविलेल्या या मनाच्या मोठेपणामुळे ‘मी आहे म्हणून चाललंय..!’ या आत्मिक समाधानाची आज खरोखर कीव आली.
‘नाण्याला दोन बाजू असतात’ अगदी त्याचप्रमाणे या जगात अशीही माणसं आहेत जी आपल्या जीवावर उदार होऊन समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय या भावनेने जगतायत. याचही आज खूप समाधान वाटलं की, ‘दोन घेऊन दोन ठेवून’ या सूत्राने चाललेल्या जगात असेही काही दानी हात आहेत की, जे अगदी सहज सांगतायत ‘परार्था प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे - जगाला प्रेम अर्पावे !’
- निधी जोशी - खेर, टिळक आळी - रत्नागिरी