रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच नावाने सुरू असलेल्या योजनेचा लाभ चतुर्थश्रेणी कर्मचारी सफाई कामगार यांना मिळावा, अशी मागणी भाजपचे भटक्या विमुक्त जाती जमाती जिल्हा संयोजक नीलेश आखाडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सफाई कामगार यांचे काम फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेत सर्व सफाई कामगारांचा समावेश झाला पाहिजे. राज्यातील नगरपालिका सफाई कामगारांची सेवा पाहता त्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास मोफत घरे देण्याचा ठराव झाला आहे. मात्र, या ठरावाला राज्यभरात हरताल फासले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांना या याेजनेचा लाभ मिळू शकताे. मात्र, या याेजनेची अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणाम हे कर्मचारी या हक्काच्या घरांपासून वंचित राहत आहेत, असे नीलेश आखाडे यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेसाठी निधी उपलब्ध करून सर्व सफाई कामगारांना हक्काची घरे मिळवून द्यावीत, अशी मागणी नीलेश आखाडे यांनी केली आहे.